मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ !
साताऱ्यातील (Satara) मृत महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.
या संवेदनशील प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विधानावरून आधीच वाद पेटलेला असताना, आता त्याच मार्गाने जात मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या विधानामुळे नवा गदारोळ होण्याची शक्यता आहे. या सत्ताधारी नेत्यांच्या भूमिकेमुळे ‘मृत डॉक्टर महिलेचं चारित्र्यहनन सुरू आहे का?’ असा थेट सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.
काय म्हणाले गोरे?
महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे ‘त्रिकोणी संबंध’ असल्याचा दावा चाकणकर यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर आता मंत्री जयकुमार गोरे यांनीही त्याच सुरात सूर मिसळला. “जर चॅट (Chat) समोर आले, तर सगळे सत्य स्वीकारावे लागेल. आपली संस्कृती असं करायला लावत नाही, कुणीही यात राजकारण करू नये, असे गोरे म्हणाले आहेत.
मंत्री गोरे आणि चाकणकर या दोघांनीही केलेल्या विधानांमुळे मृत महिला डॉक्टरच्या खाजगी आयुष्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे आणि या दोघांच्या विधानांमुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळाला आहे. विरोधकांनी हे विधान म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून केलेलं चारित्र्यहनन असल्याचं म्हटले आहे.
या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आक्रमक असलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानावरून जोरदार टीका केली. त्यांनी गोरे आणि रुपाली चाकणकर यांना उद्देशून एक कथा (Story) सुनावत त्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
सत्ताधारी पक्षाचे नेते अशी भूमिका घेत असल्याने विरोधी पक्षाला यावरून सरकारला घेरण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) अजित पवार यांनीही रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना फोन करून चाकणकर यांना जाब विचारणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.


