पालघर प्रतिनिधी :मिलिंद चुरी
पालघर : जिल्हा परिषद पालघर अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हास्तरीय क्रीडा मेळावा २०२५–२६ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय मेळावा बुधवार, २१ ते शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ या कालावधीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर येथे संपन्न होणार आहे.
या क्रीडा मेळाव्याचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. तालुका स्तरावर पार पडलेल्या क्रीडा स्पर्धांमधून विजयी ठरलेले तसेच जिल्हा स्तरावर निवड झालेले खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून, याच कालावधीत जिल्हास्तरीय अंतिम फेऱ्या पार पडणार आहेत.
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, कॅरम, बॅडमिंटन, बुद्धिबळ, संगीत खुर्ची, धावणे, रिले आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून खेळाडू आपली कौशल्ये, चपळता व संघभावना सादर करणार आहेत.
क्रीडा स्पर्धांसोबतच शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, अधिकारी व कर्मचारी आपली कलागुणांची झलक सादर करणार आहेत.
दरम्यान, गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी कृषी व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी व्यवसाय व पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिर व कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत होणाऱ्या या शिबिरामध्ये दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व वराह पालन या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक शेतकरी व पशुपालकांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
संपूर्ण क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व कृषी मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांनी कृषी व पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
