दै. चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड –
रामानंद संप्रदायाच्या प्रेरणेतून जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, दक्षिणापीठ नाणीजधाम यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून रक्तदान शिबीर घेण्यात आले होते त्यात विक्रमी संकलन झाले आहे. यात भोकर तालुक्यातून ३७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शेकडो ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. समाजात सेवा, त्याग आणि मानवतेची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक नागरिकांनी या महायज्ञात १,६५,००० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
या रक्तदान शिबिरास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामागे संस्थानचा ‘ब्लड इन निड’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम मोलाचा ठरला आहे. या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात जेव्हा-जेव्हा रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते, तेव्हा संस्थानाच्या माध्यमातून रक्त सहज, तात्काळ व पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाते. या सेवेमुळे आतापर्यंत असंख्य गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अनेकांना संस्थानाबद्दल अपार विश्वास आहे. त्यामुळेच जीवनदान महाकुंभात अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वयंस्फूर्त सहभाग नोंदविला.
