अमरावती ( प्रतिनिधी)- संजय सरवटकर
अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक कारवाईत महावितरण कार्यालयातील अभियंता अजय विलास चौधरी (वय ३३) याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या घरी वीज मीटर संदर्भात कारवाई करण्याची धमकी देत सहाय्यक अभियंता चौधरी याने ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३५ हजार रुपयांवर सौदा ठरवण्यात आला. याप्रकरणी तक्रारदाराने २८ जानेवारी २०२६ रोजी अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचत २८ जानेवारी रोजी सायंकाळी महावितरण कार्यालय, अंजनगाव सुर्जी येथे कारवाई केली. लाच स्वीकारताच सहाय्यक अभियंता अजय चौधरी याला एसीबी पथकाने ताब्यात घेतले.
सदरची कार्यवाही अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती चे पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक श्री. सुनिल किनगे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि, ज्ञानोबा फड पो.नि.. चित्रा मेसरे, पो.शि. शैलेश कडू, वैभव जायले, चालक पो.उ.नि.सतीश किटूकले, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या प्रकरणी संबंधित अभियंत्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी अमरावती विभागातर्फे करण्यात आले आहे.
