यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे देवच जाणे; राजनाथ सिंहांची फायनल वॉर्निंग…
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भविष्यात भारताकडून कोणतीही कारवाई झाल्यास कोलकात्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आता यावर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पाकिस्तानला कडक इशारा दिला.
सिंह यांनी पाकिस्तानच्या विभाजनाचा ऐतिहासिक संदर्भ देत इस्लामाबादला तणाव वाढवणारी वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असे भडकाऊ वक्तव्य करायला नको होते. 55 वर्षांपूर्वी त्यांनी त्याचे परिणाम भोगले, जेव्हा पाकिस्तान दोन भागांत विभागला गेला होता, असे ते म्हणाले.
यावेळी सिंह त्यांनी आणखी इशारा देत म्हटले की, जर पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर यावेळी पाकिस्तान किती तुकड्यांत विभागला जाईल हे देवच जाणे. सिंह यांची प्रतिक्रिया ख्वाजा आसिफ यांनी दिलेल्या विधानानंतर आली आहे. त्यांनी असा इशारा दिला होता की, भारताने जर कथित फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानकडून कोलकात्यावर हल्ला केला जाईल.
ख्वाजा आसिफ काय म्हणाले?
भारताकडून भविष्यात कोणतीही कारवाई झाल्यास पाकिस्तान ठोस प्रत्युत्तर देईल. जर भारताने यावेळी कोणतेही फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर अल्लाहच्या कृपेने आम्ही ते कोलकात्यापर्यंत नेऊ, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काही लोकांचा वापर करून भारत फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करू शकतो आणि त्यांचे मृतदेह दहशतवाद्यांप्रमाणे दाखवले जाऊ शकतात. मात्र या आरोपांना त्यांनी कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत. तसेच पाकिस्तानकडून कोणत्याही हल्ल्याला त्वरित, संतुलित आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असे ही आसिफ म्हणाले होते.
त्यांनी हे विधान राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून केले होते. सिंग यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, सध्याच्या परिस्थितीत भारताविरुद्ध कोणतेही मिसअॅडव्हेंचर केल्यास त्याला अभूतपूर्व आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.
गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या Pahalgam attack हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवसांचा संघर्ष झाला होता. त्या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
