जर भारताने कोणतीही कारवाई सुरू केली, तर पाकिस्तान पश्चिम बंगालवर हल्ला करून प्रत्युत्तर देईल, असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलिकडेच दिला होता.
याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या धमक्यांबाबत मौन का बाळगले आहे? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमधील बॅरकपूर येथील सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिषेक बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ख्वाजा आसिफ यांना इतिहासापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे.
ख्वाजा आसिफ यांना भूतकाळातील घटनांचा आठवण करून देत राजनाथ सिंह पाकिस्तानला इशारा दिला की, 55 वर्षांपूर्वीच्या परिणामांचा तुम्हाला विसर पडू देऊ नये, जेव्हा तुमच्या राष्ट्राचे दोन भागांमध्ये विभाजन झाले होते. त्यामुळे पाकिस्तानने जर पश्चिम बंगालकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे अगदी क्षणभरासाठी का होईना धाडस केले, तर त्यांचे किती तुकडे होतील हे केवळ देवालाच ठाऊक, असा इशारा देताना राजनाथ सिंह यांनी अभिषेक बॅनर्जी यांनी केलेल्या विधानालाही प्रत्युत्तर दिले.
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून ते स्वतःच या विषयावर भाष्य करत आहेत. त्यामुळे प्रत्येक विषयावर पंतप्रधानांनी बोलणे आवश्यक नसते. भारताची सुरक्षा आणि संरक्षणविषयक बाबींबाबत सरकारचे धोरण पूर्णपणे स्पष्ट आहे. तसेच या देशाचा मी स्वत: संरक्षण मंत्री आहे, त्यामुळे संरक्षणविषयक विषयांवर बोलण्याचा मलाच पूर्ण अधिकार आहे.
अभिषेक बॅनर्जी काय म्हणाले होते?
एका जाहीर सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी थेट पश्चिम बंगालला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. असे असूनही केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप त्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्याचे धाडस दाखवलेले नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे निवडणुकीच्या प्रचारात इतके मग्न आहेत. त्यामुळे त्यांना पश्चिम बंगालच्या सुरक्षेची यत्किंचितही पर्वा नाही. स्वतःकडे 56 इंचांची छाती असल्याचे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेजारील राष्ट्राकडून होणाऱ्या धोक्यांच्या मुद्द्यावर पूर्णपणे मौन बाळगले आहे. पश्चिम बंगालच्या जनतेच्या जीवाला त्यांच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही का? जर केंद्र सरकारकडे खरोखरच धाडस असेल, तर त्यांनी लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाला (BSF) मोकळीक द्यावी, जेणेकरून पाकव्याप्त काश्मीर (POK) पुन्हा मिळवता येईल. कारण पाकिस्तान भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला केला आहे, त्यामुळे सरकारने याप्रकरणी तातडीने कारवाई करावीस, अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी केली होती.
