ट्रम्प यांच्या निर्णयाने वॉशिंग्टन पेटलं; व्हाईट हाऊसला आंदोलकांचा वेढा…
जागतिक राजकारणात गेल्या काही तासांत अशा घडामोडी घडल्या आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.
इराणवर विनाशकारी हल्ले करण्याची भाषा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक १५ दिवसांचा युद्धविराम जाहीर केला आहे. या निर्णयाने जगाला दिलासा मिळाला असला तरी, खुद्द अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये मात्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या या ‘यू-टर्न’मुळे संतप्त झालेल्या हजारो अमेरिकन नागरिकांनी व्हाईट हाऊसला घेराव घातला असून, तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.
पाकिस्तानची मध्यस्थी आणि ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वर धमाका
या संपूर्ण युद्धविरामाच्या मागे पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याचे समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर स्वतः ही माहिती दिली की, त्यांनी इराणवरील बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाई दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये समोरासमोर बसून शांततेसाठी चर्चा करतील. विशेष म्हणजे, इस्रायलनेही सध्यापुरते इराणवरील हल्ले थांबवण्यास संमती दिली आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी: ट्रम्प यांची मोठी अट
हा १५ दिवसांचा शस्त्रसंधी केवळ तात्पुरता दिलासा नसून त्यामागे ट्रम्प यांनी एक मोठी अट ठेवली आहे. इराणने तातडीने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) जागतिक व्यापारासाठी पुन्हा उघडली पाहिजे. जर इराणने या सागरी मार्गावरील नाकेबंदी हटवली नाही, तर १५ दिवसांनंतर अमेरिका पुन्हा आपल्या लष्करी मोहिमेला सुरुवात करेल. या अटीमुळे इराणवर आता जागतिक दबाव वाढला असून, तेलाच्या किमती नियंत्रणात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
वॉशिंग्टनमध्ये उद्रेक: ‘हा ट्रम्प यांचा कमकुवतपणा!’
एककीडे शांततेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वॉशिंग्टनमध्ये मात्र तणाव वाढला आहे. व्हाईट हाऊसबाहेर जमलेल्या आंदोलकांचा असा आरोप आहे की, ट्रम्प यांनी इराणसमोर गुडघे टेकले आहेत. या आंदोलकांच्या मते, इराणला १५ दिवसांचा वेळ देणे म्हणजे त्यांना पुन्हा लष्करी ताकद गोळा करण्याची संधी देण्यासारखे आहे. आंदोलकांनी ‘No Deal with Iran’ आणि ‘Strong America’ अशा घोषणा देत व्हाईट हाऊसचा परिसर दणाणून सोडला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, व्हाईट हाऊसच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त लष्करी तुकड्यांना पाचारण करावे लागले आहे.
इस्लामाबाद ठरणार शांतीदूत की युद्धाचा नवा तळ?
आता संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करणे हा या १५ दिवसांच्या ब्रेकचा मुख्य उद्देश आहे. विश्लेषकांच्या मते, हा केवळ तात्पुरता संघर्ष थांबवणे नसून, एका चिरस्थायी शांततेसाठी केलेली धडपड आहे. जर इस्लामाबादमधील चर्चा यशस्वी झाली, तर मध्य-पूर्वेतील युद्धाचे ढग विरळ होऊ शकतात. मात्र, जर ही चर्चा निष्फळ ठरली, तर १५ दिवसांनंतर आखाती देशांत पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव सुरू होण्याची भीती आहे.
