आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यामुळे वादंग !
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. बीफ खाण्यावरुन मुख्यमंत्री सरमा यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
सरमा यांनी सुरुवातीला मांडलेली भूमिका आणि निवडणुकीच्या तोंडावर मांडलेली भूमिका विरोधाभासी असल्याने आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?
‘मुस्लिम लोक बीफ खातात. त्यावर कुठलीही बंदी नाही. आसाममध्ये बीफ खाणाऱ्या मुस्लिम समुदायाची संख्या मोठी आहे. आम्ही त्यांना बीफ खाऊ नका असे सांगत नाहीये. आम्ही फक्त त्यांना बीफ घरात खाण्यास सांगतोय. सार्वजनिक ठिकाणी बीफचे सेवन करु नका’, असे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
यापूर्वी घेतली होती वेगळी भूमिका
दरम्यान, यापूर्वी बीफ खाण्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची भाषा सरमा यांनी वापरली होती. ‘गायीचे मांस खाणाऱ्यांना सोडणार नाही’, असा इशाराच त्यांनी दिला होता. पण, सरमा यांनी निवडणुकीच्या तोंडावर एकदम विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. मंदिर परिसरापासून पाच किलोमीटरच्या बाहेर, सार्वजनिक ठिकाणे वगळता घरात बीफ खाण्यास हरकत नाही, अशी भूमिका सरमा यांनी मांडली आहे.
विरोधकांकडून टीका
मुख्यमंत्री सरमा यांच्या वक्तव्यामुळे आसामच्या राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ‘भाजपा हटवा, गाय वाचवा’, असे आवाहन करत समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली. अखिलेश यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करुन भाजपावर टीका केली.
केजरीवालांचे टीकास्त्र
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपावर टीका करताना, ‘गाय त्यांच्यासाठी निवडणुकी पुरता महत्वाचा वाटणारा मुद्दा असून, दंगे आणि अशांतता निर्माण करण्याचे साधन आहे’, अशा शब्दात सरमा यांचा समाचार घेतला. ‘उत्तर भारतात कथित गोरक्षक नागिकांचे खून करत आहेत. त्यांचे स्वत:चेच नेते आता बीफ खा म्हणून सांगत आहेत’, असे केजरीवाल म्हणाले.
आसामचा कायदा काय सांगतो?
‘आसाममध्ये सार्वजनिक ठिकाणी बीफ खाण्यास बंदी असून, उल्लंघन करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते’, असे मुख्यमंत्री सरमा माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. दरम्यान, आसाममध्ये पशुधन संरक्षण कायदा, २०२१ अस्तित्वात आहे. पण, या कायद्याअंतर्गत गोहत्येला प्रतिबंध नाही. पण, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोहत्या करण्यास मनाई आहे. पण, राज्यात दुकानांमधून गायीचे मांस खरेदी करून घरी किंवा खासगी आस्थापनांमध्ये खाल्ले जाऊ शकते, असे कायद्यात नमूद आहे.
