‘या’ ठिकाणी उद्धव ठाकरेंना जबर हादरा…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतराची लाट सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यात कोकण विभागातील चिपळूण आणि उरण येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली असून, उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सोशल मीडियावर ट्विट करून या पक्षप्रवेशाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “उबाठा गटाचे कोकणातील चिपळूणचे युवासेना विस्तारक आणि चिपळूण तालुकाप्रमुख उमेश खलाटे, उरणचे उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख विनोद साबळे आणि विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील निलहोड नगर पंचायतीतील अपक्ष नगरसेवक सुरेंद्र गौतम यांच्यासह त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.”
चिपळूणमधील या मोठ्या प्रवेशात विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती सावंत-देसाई, इकबाल बेबल, विराज खताते, समीर कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमित भुरण, दीप्ती भुरण आणि असंख्य इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच उरणमधून उपसरपंच अमर म्हात्रे, सुनंदा म्हात्रे, संकल्प घरत, नामदेव ठाकूर, अवधेश महतो, उत्तम चिकणे, समर्थ सोळंकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा राजश्री कदम, उपाध्यक्षा बालिकाताई जाधव यांच्यासह असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भगवा झेंड्याखाली येऊन शिवसेनेत सामील झाले आहेत.या सर्व प्रवेशामुळे कोकण विभागात शिवसेना (शिंदे गट) ची मजबूत पकड वाढली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फायदा होणार असल्याचे सूचित होत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
