सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस…
बारामतीतील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर करत थेट लढाईचा निर्णय घेतला आहे.
यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता संपुष्टात आली असून, आता ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली. खासदार पार्थ पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस हा देशातील एक जुना आणि व्यापक पाया असलेला पक्ष आहे. “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला, हे विसरू नका. पुढील काही दिवसांत अनेक घडामोडी होतील,” असा सूचक इशारा त्यांनी दिला.
या निवडणुकीचे महत्त्व केवळ एका मतदारसंघापुरते मर्यादित नाही. बारामती ही अनेक वर्षे एका विशिष्ट नेतृत्वाखाली राहिलेली जागा आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांत या मतदारसंघाने एकाच नेतृत्वावर विश्वास ठेवला. त्यामुळे आता निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि त्यावर विविध पक्षांची भूमिका, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
भाजपने उमेदवार न देण्याच्या निर्णयावरही सतेज पाटील यांनी भाष्य केले. “कोणत्या पक्षाने काय करावे हे आम्ही ठरवणार नाही, पण काँग्रेस स्वतःचे निर्णय स्वतः घेते,” असे सांगत त्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका अधोरेखित केली.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळाल्याने ही लढत अधिक रंगतदार झाली आहे. पक्ष माघार घेणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावत, काँग्रेस पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
