दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-मेळघाटातील सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सिमाडोह गावापासून एक किलोमीटर अंतरावर काही दिवसांपूर्वी नर व मादी अशा दोन बिबट्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
माहिती प्राप्तीनुसार या प्रकरणात वन विभागाच्या पथकाने सिमाडोह येथील एका चाळीस वर्षीय शेळी मालकाला दिनांक ८ डिसेंबर रोजी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली.अटक केलेल्या व्यक्तीच्या ३ शेळ्या बिबट्यांनी मारल्या होत्या.त्याचा सूड घेण्यासाठी या शेळी मालकाने विषप्रयोग करून बिबट्यांचा बळी घेतल्याचे वन विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.राजेश तायवाडे (४०,रा.सिमाडोह) असे वन विभागाने अटक केलेल्या शेळी मालकाचे नाव असून तायवाडे यांच्याकडे शेळ्या होत्या.त्या शेळ्यांना सिमाडोह जंगल भागात चरण्यासाठी नेत होते.दरम्यान,या भागात वास्तव्यस असलेल्या एक नर व मादी बिबट्याने तायवाडेच्या ३ शेळ्यांना भक्ष केले.त्यामुळे संतप्त तायवाडेने २ मृत शेळ्यांवर विष टाकले.त्या विषारी शेळ्या खाण्यासाठी बिबटे आले व ते मांस खाल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत्यु झाला.ही घटना समोर आल्यानंतर वन विभागाने तपास सुरू केला.मृत दोन्ही बिबट्यांच्या तोंडातून फेस येत असल्यामुळे प्राथमिकदृष्ट्या हा प्रकार विष प्रयोगाचा असल्याचे समोर आले होते.त्या दृष्टीने तपास सुरू असताना वन विभागाच्या पथकाला तायवाडेच्या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचे समजले.बिबट्याच्या मृत्यूसाठी तायवाडे कारणीभूत असल्याचे समोर येताच त्यांना वन विभागाने अटक केली.
