दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर
जव्हार:- अनुसूचित जाती-जमाती अथवा इतर मागासवर्गीय या जातींना असलेल्या आरक्षणाच्या आडून शासकीय सेवेत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे दाखल झालेल्या बोगस आदिवासींना शासनाने सेवेत कायम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात जव्हार येथील प्रांत कार्यालय येथे धरणे आंदोलन करीत उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आरुषी सिंह यांना निवेदन घेऊन शासनाचा निषेध करण्यात आला.
या बोगस आदिवासींवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे.या मागणी करिता जनजाती विकास मंचाच्या नेतृत्वात वनवासी आश्रम,एकल विद्यालय,कला फाउंडेशन,केशव सृष्टी व युवा सामर्थ्य प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन यांच्यामार्फत निषेध धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.शासनाने याबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करुन येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकींवर बहिष्कार टाकला जाईल असा इशाराही या संघटनामार्फत देण्यात आला आहे.
जनजाती विकास मंचाचे पालघर जिल्हाध्यक्ष नरेश मराड,वनवासी कल्याण आश्रमाचे गंगाराम गावित,एकल विद्यालयाचे विलास माळी,केशव सृष्टीचे कैलास कुरकुटे,कला फाउंडेशनचे यशवंत तेलम,युवा सामर्थ्य प्रतिष्ठान,डॉ.रामदास मराड,ॲड.कोदे,तुकाराम महाले तसेच शेकडो आदिवासी बंधू-भगिनींनी या धरणे आंदोलनात सहभागी होऊन शासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करून बोगस आदिवासींच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.
