दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:-राम चिंतलवाड
हिमायतनगर (नांदेड ) – महाराष्ट्र सरकारने कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा. या मागणीचे निवेदन मंगरूळ चे उपसरपंच तथा सोसायटी संचालक संतोष आंबेकर यांनी हिमायतनगर तहसिलचे नायब तहसिलदार मा. तामसकर साहेब यांच्यामार्फत शालेय शिक्षणमंत्री मा. दिपक केसरकर यांना ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले होते. या नियोजनाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत पुढील कार्यवाही करण्यास लवकरच पावले उचलत असल्याचे एका पत्रकातून कळवले आहे.
सदरचे निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड मार्फत मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्याची एक प्रत नुकतीच संतोष आंबेकर यांना पाठवण्यात आली आहे. संतोष आंबेकर यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.यामुळे बंद पडत असलेल्या जिल्हा परिषद शाळा या नक्कीच वाचतील अशी आशा आहे. तसेच यामुळे वस्ती-तांड्यातील, खेड्यापाड्यातील शाळा वाचतील तसेच गरिबांच्या लेकरांना शिक्षणाचा हक्क नक्कीच आबाधीत राहील यात शंका नाही.
अवघ्या महाराष्ट्रातून याबाबत अनेकांनी निवेदन दिले पण हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील उपसरपंच तथा सोसायटी संचालक संतोष आंबेकर यांनी पाठवलेल्या निवेदनाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली यामुळे ही बाब नक्कीच लक्षणीय अशीच आहे. यामुळे कमी पटसंखेच्या शाळा बंद न करण्याच्या या लढ्यात त्यांचे नाव अग्रस्थानी असेल हे नक्कीच म्हणता येईल.
