दैनिक चालू वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा चांदवड काठ्यापाडा येथील विद्यार्थ्यांची एक दिवसीय ‘जव्हार दर्शन’ शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, ऐतिहासिक व भौगोलिक स्थळांची ओळख व्हावी आणि सहलीतून सामाजिक व सांस्कृतिक जाणीवा विकसित व्हाव्यात, या हेतूने ही सहल आयोजित करण्यात आली होती.
सहलीसाठी पालकांनी स्वखर्चाने आर्थिक मदत करून शाळेला मोठे सहकार्य केले. तसेच सहलीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी नाश्ता, पाणी व जेवणाची व्यवस्था गंजाड रायतळी प्रीमियर लीगमधील सदस्यांनी केली. विलास दळवी, लाडक्या वरठा, मनोज ओझरे आदींनी मनापासून पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक मदत केली. त्यांच्या या सहकार्यामुळे शाळेची ही पहिलीच सहल यशस्वीरीत्या पार पडली.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना जव्हार येथील विविध ऐतिहासिक, नैसर्गिक व पर्यटनस्थळांची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जव्हारचा ऐतिहासिक व भव्य असा जव्हार राजवाडा पाहून तेथील वास्तुशैली व इतिहासाची माहिती जाणून घेतली. तसेच निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या हनुमान पॉइंट व सनसेट पॉइंट येथे विद्यार्थ्यांनी परिसर निरीक्षण केले. डोंगररांगांमधील सुंदर दृश्यांचा आनंद घेताना त्यांना भौगोलिक रचनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय शिरपामाळ येथील ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती देण्यात आली, तर खडखड धरण येथे जलस्रोत, पाणी साठवण व्यवस्था व सिंचन प्रणाली याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळाली. या सर्व स्थळभेटींमुळे विद्यार्थ्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक व पर्यावरणविषयक ज्ञान अधिक समृद्ध झाले.
सहलीचे उत्कृष्ट नियोजन पुरुषोत्तम खरे, राहुल ठाकरे , दिलीप चिलबिले व प्रियंका मेशेट्टी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची, शिस्तीची व वेळेच्या काटेकोर नियोजनाची विशेष काळजी घेण्यात आली. शिक्षकांनी प्रत्येक स्थळी विद्यार्थ्यांना माहिती देत प्रश्नोत्तरांद्वारे त्यांचा सहभाग वाढवला.
ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यान एकोप्याची भावना, शिस्त, सहकार्य आणि सामाजिक समन्वय यांचे धडे घेतले. खेळ, गाणी, समूह चर्चा यांमुळे सहलीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कुतूहल आणि समाधान हीच सहलीच्या यशाची खरी पावती ठरली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा शैक्षणिक सहली अत्यंत उपयुक्त ठरत असून भविष्यातही अशाच उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे जि. प. शाळा चांदवड काठ्यापाडा शाळेची ही पहिली सहल संस्मरणीय ठरली आहे.
