प्रतिनिधी | स्वाती हडकर
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसायासोबत पर्यावरणाची जबाबदारी जपणारे उद्योजक विरळच आढळतात. मात्र शृंगारतळी येथील तरुण उद्योजक ओंकार यशवंत संसारे यांनी आपल्या कार्यातून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
संसारे कुटुंबीय गेली अनेक वर्षे हॉटेल व्यवसायात कार्यरत आहेत. वडिलांचा व्यवसाय पुढे नेत असताना ओंकार यांनी आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट सेवा आणि स्वच्छतेचा उच्च दर्जा यांचा संगम घडवला. त्यांच्या हॉटेल हेमंत ने आज तालुका व जिल्हा स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
“ग्राहक हाच देव” या तत्त्वावर विश्वास ठेवत प्रत्येक ग्राहकाला मनापासून सेवा देण्यावर त्यांचा भर असतो. “अन्नदान हेच श्रेष्ठदान” या विचाराने प्रेरित होऊन ते सेवेत कुठलीही तडजोड करत नाहीत.
पर्यावरणपूरक उपक्रम ठरतोय लक्षवेधी
हॉटेलमधून निर्माण होणारे सांडपाणी थेट गटारात न सोडता त्यांनी आधुनिक बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने त्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा उभारली आहे.
प्रयोगशाळेत तपासणी करून हे पाणी सुरक्षित असल्याची खात्री करण्यात येते. त्यानंतरच ते पाणी योग्य पद्धतीने सोडले जाते.
या उपक्रमामुळे पर्यावरणाचे संरक्षण करत व्यवसाय कसा करता येतो, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.
तरुणांसाठी प्रेरणादायी वाटचाल
व्यवसाय, समाज आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारे ओंकार संसारे हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या कामातून गावाबद्दलची आपुलकी आणि पर्यावरणाबद्दलची बांधिलकी स्पष्ट दिसून येते.
समाजाकडून कौतुक
या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या कार्याला पर्यावरणपूरक उद्योजकतेचे आदर्श उदाहरण म्हणून गौरविले जात आहे.
