दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : पुणे महापालिकेत प्रशासक आल्यानंतर शहरात डासांचा उपद्रव वाढला आहे. नदीपात्र आणि तलावातील जलपर्णी काढली नसल्याने डासांचा उपद्रव वाढल्याचा आरोप भाजपने केला आहे.
शहर भाजपच्या शिष्ट मंडळाने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचा पाढा वाचला. महापालिकेतील सभासदांची मुदत १५ मार्चला २०२२ ला संपली. पुणे पालिकेत भाजापची सत्ता होती. या पाच वर्षात पुणे शहरात डास नव्हते आणि या महिन्यात प्रशासक आल्यापासून शहरात डासांचा उपद्रव जास्त वाढला असल्याचे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय याच बरोबर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाणी पुरवठा उपनगरात वेळेत होत नाही. अशा अनेक समस्या असल्याचे मुळीक यांनी सांगितले. शहरातील पाणपुरवठा सुरुळीत करावा, रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली.
