दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी – किशोर वाकोडे
अवधा नांदुरा: दि.८.तालुक्यातील ग्रामपंचायत अवधा बु येथील सरपंच सचिव यांनी शैक्षणिक साहित्य वाटपात रुपये ९६,५०० रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सरपंच गजानन कडू उन्हाळे व तत्कालीन ग्रामपंचायत सचिव अभिषेक हिवाळे यांनी शैक्षणिक साहित्य वाटपात अफरातफर करून भ्रष्टाचार केला असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सरपंच व सचिव यांनी ही रक्कम वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांनी दिले आहे.
याबाबत सविस्तर असे की राहुल शंकर खंडेराव यांनी १७/ ८/२१ रोजी ग्रामपंचायत अंतर्गत १४ वा वित्त आयोगातून शाळेला व अंगणवाडी ला दिलेल्या शैक्षणिक साहित्य मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून सरपंच व सचिवावर गुन्हे दाखल करण्याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी एस. बी. नारखेडे यांनी या प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला. या अहवालानुसार ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या व अदा केलेल्या देयक एकूण रक्कम १,७३,३०० चे शैक्षणिक साहित्य पैकी ग्रामपंचायत अवधा बुद्रुक अंतर्गत असलेल्या तिन्ही शाळा व अंगणवाडी ला फक्त रुपये ७६,५०० चे शैक्षणिक साहित्य वितरित केल्याचे दिसून आले. उर्वरित रक्कम रुपये ९६,५०० चे साहित्य पुरविले नसून फक्त देयक अदा करुन अफरातफर झाल्याचे आढळून आले. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ चे नियम १० नुसार रक्कम रुपये ९६,५०० चे अफरातफरी करिता सरपंच गजानन कडू उन्हाळे व तत्कालीन सचिव अभिषेक हिवाळे यांच्याकडून समप्रमाणात प्रत्येकी रुपये ४८,२५० वसूलपात्र ठरतात असा अहवाल सादर करण्यात आला असून सरपंच,सचिवाकाडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहे.या झालेल्या भ्रष्टाचाराची तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे तर यामध्ये दोषी असलेल्या सरपंच व सचिवावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राहुल शंकर खंडेराव हे करीत आहे.
