दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
मुंबई– मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अर्जित रजा जर शिल्लक राहिल्या तर त्यांना निवृत्तीनंतर याचे आर्थिक लाभ मिळतात. 2019 पर्यंत हे लाभ सहाव्या वेतन आयोगानुसार मिळत होते. मात्र सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर नवीन संरचनेनुसार हे लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु शासनाचा कुठलाही निर्णय किंवा पत्रक नसल्यामुळे वेतन पथक अधीक्षक व इतर अधिकारी नवीन वेतन संरचनेनुसार हे लाभ देण्यास नकार देत होते. यासंदर्भात तेल्हारा येथील मुख्याध्यापिका श्रीमती पद्मावती टिकार निवृत्त मुख्याध्यापिका यांच्यासह अनेक मुख्याध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री किरणराव सरनाईक यांना यासंदर्भात निवेदने दिली. मा.श्री सरनाईक यांनी या निवेदनाची दखल घेऊन मागील दोन महिन्यांपासून श्रीमती वर्षाताई गायकवाड शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून नवीन वेतन संरचनेनुसार अर्जित रजेचा लाभ मिळण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
