दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी-किशोर वाकोडे
बुलढाणा.दि.१३.राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या मोताळा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथील आरोपीला बुलढाणा एल.सी.बी. च्या पथकाने मलकापूर, बुलढाणा रोडवर पकडले. त्याच्या ताब्यातून २ लाख ३२ हजार ४७८ रुपयांचा माल जप्त केला आहे.
मलकापूर कडून बुलढाणा शहरात एक व्यक्ती ऑटोरिक्षा मध्ये गुटखा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती बुलढाणा येथील एल.सी.बी. च्या पथकाला मिळाली होती. दरम्यान एल .सी.बी. च्या पथकाने सोमवारी सकाळी बुलढाणा शहरातील मलकापूर रस्त्यावरील नगरपंचायत शाळा क्रमांक सात नजीक सापळा रचला असता, आकाश गणेश गाडेकर (२१ वर्ष, रा. वाघजाळ फाटा,ता. मोताळा.)हा सकाळी १० वाजताच्या सुमारास ऑटो रिक्षा मध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विमल आणि वहा ८२ हजार ४७८ रुपयांचा गुटखा आणि दीड लाख रुपये किमतीचा ऑटोरिक्षा असा एकूण दोन लाख ३२ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात आरोपी आकाश गणेश गाडेकर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करतो प्रसंगी एस.पी. अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवन दत, आणि बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात एल.सी.बी.पोलिस निरीक्षक बळीराम गीते, यांच्या आदेशाने एपीआय मनिष गावंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लोकूरवाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल राम विजय राजपूत, पोलीस ना. गणेश पाटील, दिनेश बकाले, राहुल भटकर, गजानन गोरले, यांनी कारवाई केली.
