दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
**************************
परभणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा आज सकाळी तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे.
परभणी शहरातील शिवराम नगर परिसरात आज मंगळवार, दि. ६ सप्टेंबर २२ रोजी सकाळी मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांची मित्रमंडळीत आपसात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. त्यातूनच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. यावेळी धारदार शस्त्र (चाकू) द्वारा सपासप वार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सदर घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, सपोनि सर्वश्री मुंढे, गवाळे, नांदगावकर, पोउनि श्री केंद्रे, पो.कर्मचारी आर. एस. मुंढे व गरधाळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सचिन पाटील यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचे निधन झाल्याचे समजले.
सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला असून पुढील कार्यवाही त्यानंतरच केली जाईल असे कळत आहे. घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अजून तरी गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याचे सांगितले जात असले तरी संध्याकाळ पर्यंत ती प्रक्रिया सुध्दा पूर्णत्वास जावू शकेल असे वाटते. एकूणच या प्रकारामुळे परिसर व शहरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली जाऊ नये यासाठी पोलीसही पूर्णपणे सतर्क असल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून परभणी शहर व परिसरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा रेषो कमालीचा वाढीस लागल्याचे वृत्त आम्ही सातत्याने प्रकाशित करुन पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या अनुषंगाने पोलीसही आपले कर्तव्य डोळ्यात तेल घालून पार पाडीत असावेत यात शंकाच नसावी तथापि शहर व परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत जेवढे आवश्यक आहे, तेवढे पोलीस बळच जर उपलब्ध नसेल तर त्याला यंत्रणा तरी काय करु शकते हा खरा सवाल आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होणे किंवा करणे हा भाग दूरापास्त जरी असला तरी किमान पक्षी त्यावर नियंत्रण आणणे तरी शक्य व्हावे यासाठी त्या तुलनेत पोलीस बळ वाढविणे गरजेचे ठरु शकते. क्षुल्लक कारणांवरून वाढीस लागणारी असंवेदनशीलता कधी आणि कोणत्या थराला जाऊ शकेल यांचेही अंदाज बांधणे आता अधिकच कष्टप्राय होऊन बसतांना दिसतेय. परिणामी त्यामुळेच पोलीस आणि खाकी वर्दीचे भय कमी तर होत नाही ना, अशी भिती नव्हे तर वास्तविकता दाहकते आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
