दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर –अकलूज रोड वरुन शेटफळ पाट्टी ते निमगाव केतकी रोडवरील शेटफळ पाटी येथील आशिर्वाद गार्डन मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे व नादुरुस्त कठड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसून हा पूल अपघातास निमंत्रण देत आहे. या पुलाची दयनीय अवस्था झाल्यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
पहिल्याच पावसात पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याने खड्डे भरल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना रस्ता शोधावा लागत आहे. वाहन चालकांना गाडी चालवताना खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पुलावरून जड वाहन गेली की पूल हादरतो. तसेच या पुलावर अनेक अपघात या अगोदर सुद्धा खड्ड्यामुळे झाले आहेत. त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला आहे. दोन दिवसांपासून पावसाचे पाणी साचल्याने हा खड्डा दिसून येत नाही. या पुलावरून शेटफळ, निमगाव,लोणी आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते.
या खड्ड्यांमुळे वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. या खड्ड्यात दुचाकीचे चाक अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाताना या पुलावर खड्ड्यामुळे रात्रीच्या वेळी छोट्या वाहनांचा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच हा पुल खूप उतारावरती आहे.त्या दृष्टीने या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता असताना सुद्धा याकडे चक्क दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
आज सकाळी वकील वस्ती येथील युवक ज्ञानदेव भोसले यांनी या भागातील इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस बापू बोराटे यांना फोन करून या ठिकाणी आपण भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केली.
या पुलाची उंची वाढवून पुलावरील हे खड्डे त्वरित भरण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
