दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
पैठण : सामनातल्या रोखठोकला पैठणच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी तितक्याच रोखठोक शब्दात उत्तर दिले. भाजपा बरोबर जाऊन शिंदे गटाने आपली सुंता करून घेतली आहे, असे रोखठोक मध्ये लिहिले होते, पण आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो.
जनतेने दिलेल्या कौलाशी प्रामाणिक राहिलो. पण हिंदुत्वाचा विचार सोडून देऊन, याकूब मेमनच्या कबरीला परवानगी देऊन वैचारिक सुंता कोणी करून घेतली??, असा रोखठोक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणच्या सभेत केला आहे.
मुख्यमंत्र्यांची पैठणची सभा त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे जोरदार गाजली. पैठणच्या सभेत संदिपान भुमरे यांनी भरपूर पैसे देऊन भाड्याने माणसे आणली, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी केला होता. या आरोपांचा समाचार संदिपान भुमरे यांनी आपल्या भाषणात घेतलाच, पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कडी करत ठाकरे गटाला घेरले. त्यांच्याकडे फक्त दोनच शब्द आहेत खोके आणि बोके. सुप्रिया सुळे, अजितदादा, जयंत पाटील माझ्यावर टीका करतात, एक फोटोला मुख्यमंत्री ठेवा आणि एक मंत्रालयात काम करायला मुख्यमंत्री ठेवा. पण मी त्यांना सांगतो मी काम करणारा मुख्यमंत्री आहे.
लोक मला काम सांगायला येतात. मी त्यांची कामे करतो. पहाटे तीन – तीन वाजेपर्यंत लोक भेटायला येतात. मी त्यांना भेटतो. पण काही लोकांच्या पोटात दुखते म्हणून ते टीका करत राहतात. मी जनसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही, अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
सामनात प्रसिद्ध झालेल्या रोखठोकचाही त्यांनी समाचार घेतला. सामनात आम्हाला गद्दार, खोके – बोके अशा शब्दांमध्ये रोज डिवचतात. आता तर रोखठोक मध्ये शिंदे गटाने सुंता करून घेतल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार ज्याला फाशी दिली, त्या याकूब मेमनची कबर कुणाच्या काळात झाली?? तिला परवानगी कोणी दिली??,
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला बाजूला सारून आणि बाळासाहेबांचे विरोधक काँग्रेस – राष्ट्रवादीशी जवळीक करून स्वतःचीच वैचारिक सुंता कोणी करून घेतली??, असा परखड सवाल एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत विचारला. त्याचवेळी त्यांनी बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणाची याचे उत्तर आजच्या प्रचंड जाहीर सभेने दिले आहे, असेही स्पष्ट केले.
