दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भाजप-शिवसेनेच्या सत्तेत शासकीय पातळीवर साजरा करण्यास सुरूवात झाली होती. या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडातील ध्वजारोहण व्हावे यासाठी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रयत्न सुरू केले होते यास यश आले असून दि. १७ रोजी फडणवीस यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होईल असा कार्यक्रम जाहीर झाला आहेदेश स्वतंत्र झाल्यावरही तत्कालीन हैदराबाद संस्थानात तब्बल १३ महिने चाललेली निझामशाही १७ सप्टेंबर १९४८ रोजी संपवून स्वातंर्त्याचे अखेरचे पर्व पूर्ण करण्याच्या ऐतिहासिक घटनेचे अमृतमहोत्सवी वर्ष शनिवारी सुरू होत आहे. १७ सप्टेंबर हा आजच्या मराठवाडयाचा खराखुरा स्वातंत्र्य दिन असून यंदा औरंगाबादेतील मुख्य ध्वजारोहणास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे जाहीर झाले. यामुळे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व्हावे, असे प्रयत्न सुरू केले होते.मराठवाडा, तेलंगणा आणि आजच्या कर्नाटकच्या काही जिल्ह्यांच्या स्वातंत्र्यपर्वाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी चालेली असताना, राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ परिपूर्ण झाले नाही. यामुळे जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या थांबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी नांदेडमधील मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले पण यंदाच्या १७ सप्टेंबरला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. तसेच हैदराबादच्या स्वातंर्त्यसंग्रामात नांदेड जिल्हा महत्त्वाचे केंद्र होते, म्हणून येथील शासकीय ध्वजारोहणास फडणवीस यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती करणारे पत्र खा. चिखलीकर यांनी दिले होते. यास मान्यता मिळाली असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी दि. १७ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल असा शासकीय कार्यक्रम जाहीर झाला आहे
