दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- सध्या जवळपास सर्वच भागात ऑनलाईन पेमेंट द्वारे आर्थिक व्यवहार होत आहेत.मात्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बससेवा ऑनलाईन सेवेपासून अद्यापही दूर असून प्रवाशांना तिकिटासाठी रोख रक्कम मोजावी लागत आहे.
यासोबतच अनेक वेळा गहाळ झालेल्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद होत होता.अशा परिस्थितीत बदलता काळ लक्षात घेऊन राज्य परिवहन मंडळानेही आपल्या कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकिटांचे ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.ज्या अंतर्गत वाहकांकडे अँड्रॉइड प्रणाली आधारित तिकीट मशीन उपलब्ध केल्या जाईल.ज्यामुळे प्रवाशांजवळून प्रवासी शुल्क ऑनलाईन स्वरूपात आकारल्या जाईल.यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल.
—————————————-
वाहकाला १,००० रुपयांची ड्युटी कॅश हाताळावी लागते
लांब पल्ल्याच्या रापाणी बसेसवर ड्युटी करणाऱ्या वाहकांना १ हजार रुपयांची ड्युटी कॅश हाताळावी लागते. त्यानंतर ड्युटी संपल्यानंतर प्रवाशांना दिलेले तिकीट आणि ड्युटीची रक्कम गोदामाच्या कॅशियरला द्यावी लागते.ड्युटीवरून परतल्यानंतरही हीच प्रक्रिया पुन्हा करावी लागते.यामध्ये अनेक वेळा चुकलेल्या पैशांचा हिशोब जास्तीचा निघतो. त्यासाठी वाहकांनाही स्पष्टीकरण द्यावे लागेल.अशा परिस्थितीत,ऑनलाईन पेमेंटची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर,वाहतूकदारांना ड्युटी कॅश हाताळणे,हरवलेले पैसे परत देणे आणि ड्युटी संपल्यानंतर खात्यांची जुळवाजुळव करणे अशा सर्व कामांतून सूट दिली जाईल.
—————————————-
—————————————-
कार्ड मोबाईलद्वारे सुविधा
ड्युटी संपल्यानंतर निर्धारित वेळेत प्रवास शुल्काची रक्कम आगारात जमा न केल्याने वाहक तसेच चालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.मात्र ऑनलाईन पेमेंटच्या सुविधेमुळे हा त्रास संपणार आहे.कारण डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,गुगल पे आणि फोन पे इत्यादी ऑनलाईन पेमेंट सिस्टमद्वारे प्रवाशांनी भरलेल्या प्रवास शुल्काची रक्कम थेट राज्य परिवहन मंडळ यांच्या खात्यात जमा केली जाईल.त्यामुळे ड्युटी संपल्यानंतर आगार रोखपालाकडे पैसे जमा करताना हिशेब देण्याच्या त्रासातून वाहकांची सुटका होणार आहे.त्याचबरोबर राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना रोख रक्कम सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.
—————————————-
—————————————-
सध्याची मशीन अँड्रॉइडशी जोडली जाईल
आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य परिवहन मंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.ज्यामध्ये ऑनलाईन व्यवहारांबाबत निर्णय घेत सध्या तिकीट विक्रीसाठी वापरण्यात येणारे ईटीआय मशीन अँड्रॉईड प्रणालीशी जोडले जाईल,असा निर्णय घेण्यात आला.
