दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी संचित संदीप टांक याने नुकतेच कबड्डी खेळाच्या इंडो- नेपाळ चॅम्पियनशिपमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.नेपाळ येथील पोखरा स्टेडियममध्ये झालेल्या या चॅम्पियनशिप नेतृत्व संचित याच्याकडे होते.आपल्या खेळ कौशल्याने व अचूक रणनीतीने त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.इंडियन पॅसिफिक स्पोर्ट फेडरेशन (आयपीएसएफ) अंतर्गत प्रशिक्षण घेत त्याने अंडर १९ गटात अगोदर अमरावती संघाचे नेतृत्व करीत राज्यस्तर व नंतर राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करीत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले आणि आता या इंडो-नेपाळ चॅम्पियनशिपमध्ये देशाचे नेतृत्व करत विजय मिळवून आपल्या कबड्डी खेळासाठीचे त्याचे प्रेम व कष्ट दिसत आहेत.
संचित टांक अंजनगावमधील सीताबाई संगई विद्यालयात शिकत असताना क्रीडाशिक्षक विशाल भेलांडे,हेमंत माकोडे व शंकर दादा मालठाने यांनी संचित टांकमधील क्रीडागुणांना प्रोत्साहन दिले.शालेय स्पर्धेत यश मिळवल्यानंतर ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत बालेवाडी संकुल पुणे येथे खेळण्याची संधी मिळाली येथेच त्याला डॉ.केतन गायकवाड व राहुल पेंढारकर या क्रीडा शिक्षकांची भेट झाली.पुढे खेळात करिअर करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील रैनापूर येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत सोबत क्रीडा अॅकॅडमीमध्ये नियमित सराव केला.
राज्याचे राष्ट्रीय स्पर्धेतील नेतृत्वासाठी यवतमाळ येथे झालेल्या इंडियन स्पोर्ट फेडरेशन यांच्या आयोजनाखाली चौथ्या आयपीएसएफ नॅशनल फेडरेशन कप २०२२ मध्ये महाराष्ट्र संघाने उत्तरप्रदेश,हरियाणा,तेलंगाना,कर्नाटक आदी संघांना हरवीत फायनलमध्ये बिहारला चित केले. या राष्ट्रीय स्पर्धेत संचितने महाराष्ट्राला राष्ट्रीय ट्रॉफीचा बहुमान मिळवून दिला.
संचित टांकचे वडील स्व.संदीप देवराव टांक हे १३ ऑगस्टला २०२२ ला हृदयविकाराच्या धक्क्याने गेले.अशातच स्वतःला तसेच आपल्या परिवाराला सावरत त्याने आपली खेळाची तयारी केली व आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत या उत्तुंग शिखरावर पोहोचला.तो आपल्या यशाचे श्रेय आजोबा रामदासपंत सोनार,आपल्या आई-वडिलांना तसेच मामा आणि गुरुवर्याना देतो.आज वडील असते तर त्यांना अभिमान वाटला असता,असे भावोद्गार संचितने व्यक्त केले.संचितचे सर्वत्र कौतुक होत असून गावात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
