दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””“””””””””””””””'””””””””””””””
परभणी : मागील काही कालावधी पासून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये गोवर आणि रुबेलाचा वाढता उद्रेक लक्षात घेता जिल्हा आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क बनली गेली आहे. पालकांनी याविषयी घाबरून न जाता पाल्यांच्या लसीकरण स्थितीचे अवलोकन करुन काळजी घ्यावी. त्याच अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १५ ते २५ डिसेंबर दरम्यान च्या अकरा दिवसांत जिल्हाभर लसीकरणाची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. जेणेकरून जिल्ह्यात एकही बालक लसीकरणापासून वंचित राहाणार नाही याचे सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत.
गोवर, रुबेला लसीकरण, उद्रेक, सर्व्हेक्षण, व्यवस्थापन आणि उपाययोजना याबाबत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक घेण्यात आली, त्या प्रसंगी श्रीमती गोयल यांनी संबंधित यंत्रणेला कठोर अंमलबजावणी संबंधीचे आदेश दिले. केवळ विद्यमान काळातच नव्हे तर भविष्यातही गोवर किंवा रुबेला सारखा गंभीर धोका निर्माण होऊ नये याची दक्षता गोयल यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
याप्रसंगी जे जे महत्वपूर्ण अधिकारी उपस्थित होते त्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गीते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्याण कदम, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रावजी सोनावणे, डॉ.किशोर सुरवसे, महापालिकेच्या डॉ.कल्पना सावंत, यांच्यासह जिल्हा व तालुका स्तरावरील आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.
