महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असं सांगितलं जातंय. त्यातच आता शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नाराजीनाट्य सुरु झालंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुलाबी रंगाची पत्रिका छापून त्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं नाव छापलं आहे. एकनाथ शिंदेंचं नाव त्यांच्या पत्रिकेवर नसल्याने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आजही आमची मागणी आहे की, गृहखातं हे एकनाथ शिंदेंना मिळावं. पण तो अधिकार शिंदे साहेबांचा आहे. तडजोड करणे हा त्यांचा अधिकार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवरून शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ”ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो त्यांचं नाव नाही, असं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. राष्ट्रवादी आमचा एक घटक आहे. तीन पक्ष आहेत. नावाचा उल्लेख असायला हवा होता. पण आता ती वेळ नाही. पुढच्या काळात अशी चूक होऊ नये असं त्यांनी पथ्य पाळावं.” अशा शब्दात गुलाबराव पाटील व्यक्त झाले.
दरम्यन, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्हीही सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना नेते उदय सामंत यांनी मांडली. एकनाथ शिंदे यांच्याच हातात आमचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे, असंही ते म्हणाले.
त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावर पत्र जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
असं असलं तरी गृहमंत्री पदावर एकनाथ शिंदे ठाम असल्याची माहिती आहे. खाटेवाटपात गृहमंत्रीपद मिळावं, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला किती मंत्रिपदं येतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
