
सध्या महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच आपल्याच पक्षातील काही अकार्यक्षम मंत्र्यांची चांगल्या शब्दात कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्मल भवन येथे झालेल्या एक गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः प्रशासकीय कामातील दिरंगाई आणि पक्ष संघटनेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तेवर आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नियमित जनता दरबार घेण्याचे निर्देश दिले होते. सुरुवातीला काही मंत्र्यांनी याचे पालन केले. मात्र नंतरच्या काळात बहुतांश मंत्र्यांनी जनता दरबाराकडे पाठ फिरवली. यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. जनतेने विश्वासाने संधी दिली आहे. त्यामुळे जनतेमध्ये जा. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला दिलेल्या जिल्ह्यांची जबाबदारी पार पाडा. त्या त्या जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवा, अशा स्पष्ट सूचना शिंदे यांनी या बैठकीत दिल्या.
अनेक मंत्री फक्त सोमवार ते बुधवार मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकांसाठी येतात. त्यानंतर आपल्या मतदारसंघात परत जातात. ते पक्षवाढीच्या कामांमध्ये फारसे सक्रिय दिसत नाहीत, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. आजही अनेक कार्यकर्ते मंत्र्यांकडून कामे होत नसल्याची तक्रार माझ्याकडे करत आहेत, असेही एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटले.
कामात सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश
पक्ष आहे म्हणून आपण आहोत. जर जनतेचे प्रश्नच सुटणार नसतील, तर त्या संदर्भात विचार करावा लागेल, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी आपल्या अकार्यक्षम मंत्र्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना कामात सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याचे बोललं जात आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी आणि पक्षाच्या मंत्र्यांना कामात सुधारणा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आता यावर पुढे काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.