
विधानभवनातील राड्यानंतर थेट सांगलीत जाऊन भिडले !
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पडळकरांच्या वक्तव्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. दरम्यान जयंत पाटलांच्या मदतीला आख्खी राष्ट्रवादी सांगलीत उतरली असून काँग्रेससह शिवसेना देखील मोर्चात सहभागी झाली आहे. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळे पडळकरांचे उट्टे काढण्यासाठी आव्हाड पुन्हा सरसावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पडळकर यांनी, अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. जयंत पाटील हे स्वर्गीय राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नाही अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ज्यामुळे राज्यभर पडळकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच आज (ता. 22) सांगलीत जयंत पाटलांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पडळकरांवर जोरदार टीका केली. त्यांनी, पडळकांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत, राजारामबापू पाटील हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवणार होते. पण आज टीका करणाऱ्यांना त्यांच्या नेतृत्वची भीती वाटत नाही, याचवरून स्पष्ट होते. राजकारणात नेतृत्व आई-बापा प्रमाणे असतं, कुठल्याही नेतृत्वावर आई व बापा बद्दल टीका करणे योग्य नाही, नसल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.
गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, पोलीस कारवाई करणार नाहीत, हे आम्हालाही माहित असल्याचे जोरदार टीकास्त्र आव्हाड यांनी सोडले आहे. पुढे आव्हाड म्हणाले की, एखाद्याच्या मातृत्व आणि पितृत्वावर जाऊन टीका करणे हे, महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधीच घडले नाही. पण आज खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जातेय. ह्या खालच्या पातळीवर होणाऱ्या टीकेमुळे महाराष्ट्रालादेखील दुःख झाले आहे.
मी आणि जयंत पाटील मातृभक्त असून महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे. महाराष्ट्राची संस्कृती लयाला गेल्याचे दिसत आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीने निच्चांक गाठला आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही. राजकारणात मतभेद असतात. पण एक दुसऱ्याचा सन्मान ही करावा. जर हीच टीका आमच्याकडून झाली असती तर… पण आमच्या मनात भीती आहे. कारण शरद पवार. ते आम्हाला फोन करतील, आमचे कान पकडतील याची भीती आम्हाला आहे. पण येथे तर राजारामबापू पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यांना कोणीच रोखलं नाही, अशा शब्दात आव्हाड यांनी पडळकरांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे.
दरम्यान याआधी पडळकर आणि आव्हाड यांच्यात विधानभवनात जोरदार राडा झाला होता. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या लॉबीमध्ये एकमेकांना मारहाण केली होती.या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होते. ज्यानंतर आव्हाड यांनी पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप केला होता. या प्रकरणामुळे राज्यभर जोरदार चर्चा झाली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात इथे जे काही झालं त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतिष्ठा गेली नाहीये. तर, संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं आहे. जे बरोबर झालं नाही. आज एकट्या पडळकर यांना शिव्या पडत नाहीयेत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की, सगळे आमदार माजलेत. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत? अशा शब्दात फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना झापलं होतं.