
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सांगलीसह राज्याभर राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान सांगलीत आज (ता. 22) महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खशासदार निलेश लंके, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित होते. तसेच खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. यावरून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान करताना, जयंत पाटील हा बिनडोक माणूस असून त्याला काही अक्कल नाही. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद आहेत, असे वाटत नाही अशी शेलक्या शब्दात टीका केली होती. या वक्तव्यानंतर आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीही चांगलीच आक्रमक झाली असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे.
आज पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येथील कर्मवीर चौकात महाविकास आघाडीचा महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावत पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला. यावेळी महिलांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
विशाल पाटील यांनी या मोर्चाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशाल पाटील जयंत पाटलांचे कट्टर विरोधक मानले जातात. जयंत पाटील यांनी खासदारकीला विशाल पाटील यांच्या विरोधाक काम केले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला होता. मात्र चंद्रहार पाटलांचा पराभव लोकसभेला झाला. तेव्हा पासून विशाल पाटील जयंत पाटलांचे विरोधक असल्याचे बोलले जात होते.
मात्र वोट चोरी असो किंवा आता झालेले वादग्रस्त वक्तव्य असो विशाल पाटील हे जयंत पाटलांच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे. याआधी जतमधील वोट चोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी देखील विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या वोट चोरीचा मुद्दा धरत पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला होता. जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार हरला नाही, तो मतचोरीनं हरवल्याचा आरोप केला आहे.
आता देखील विशाल पाटील यांनी पडळकरांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसत असून आजच्या मोर्चात ते सहभागी झाले आहेत. याआधी याचमुद्द्यावर त्यांनी, पडळकर यांचा बोलवता धनी कोण? कोणी त्यांना मोकळीक दिली हे पाहिलं पाहिजे? असे म्हणत तोफ डागली होती. विशाल पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्यावरूनही पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचं काय योगदान आहे याचं सर्टीफिकेट गोपीचंद पडळकर यांच्याकडून घेण्याची गरज नसल्याचे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन याबाबत नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पडळकर यांची कानउघडणी केली. मात्र पडळकरांची मग्रुरी कमी झालेली नाही. ते माफी मागण्याचा कोणताच प्रश्न नसल्याचे म्हणत असल्याचे सांगत टीका केली होती.