
यावेळी सुरुवात फक्त ५ रुपयांपासून…
रिलायन्स उद्योग समूहानं ९ वर्षांपूर्वी जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीचे सहा महिने इंटरनेट सेवा मोफत देत जिओनं धुरळा केला. या कालावधीत जिओ बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारली.
कालांतरानं जिओनं मोफत इंटरनेट सेवा बंद केली. मात्र या कालावधीत जिओनं बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज केला होता. आता अशाच प्रकारे आणखी एका क्षेत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पाऊल टाकलं आहे. इथेही अंबानी जओ स्टाईलनं मोठा धमाका करणार आहेत.
सिम मोफत, दिवसाला १ जीबी डेटा माफक दरात अशा स्कीमसह जिओनं दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांना घाम फोडला. त्यामुळे आताच्या घडीला केवळ एअरटेल कंपनी जिओला टक्कर देत आहे. व्होडाफोन कंपनी कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. तर सरकारी कंपनी असल्यानं बीएसएनएल कशीबशी टिकून आहे. रिलायन्स जिओमुळे दूरसंचार क्षेत्रात आता अतिशय मर्यादित स्पर्धा उरली आहे. त्यामुळे ग्राहकांची गोची झाली आहे.
आता याच जिओ स्टाईलसह रिलायन्स समूह बाटलीबंद पाण्याच्या उद्योगात उतरत आहे. कॅम्पा ब्रँडच्या माध्यमातून रिलायन्सनं थंड पेयांच्या बाजारात छाप उमटवली. आता याच कॅम्पा ब्रँड खाली रिलायन्स समूह बाटलीबंद पाण्याच्या बाजारात प्रवेश करत आहे. बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ २० हजार कोटी रुपयांची आहे. सध्याच्या घडीला बाजारात १ लीटर पाण्याची बाटली २० रुपयांना, २ लीटर पाण्याची बाटली ३० रुपयांना मिळते. बिस्लेरी, किनले, ऍक्वाश्युअरच्या पाण्याचे दर असेच आहेत. यासोबतच काही स्थानिक ब्रँड्सच्या बाटल्यादेखील याच किमतीला मिळतात.
श्युअर नावानं कॅम्पाच्या बाटल्या ऑक्टोबरपासून बाजारात उपलब्ध होतील. स्पर्धेत आधीपासूनच असलेल्या अन्य कंपन्यांसोबत दरांच्या बाबतीत स्पर्धा करण्याची पूर्ण तयारी अंबानींनी केली आहे. श्युअरची १ लीटर पाण्याची बाटली १५ रुपयांना, तर २ लीटर पाण्याची बाटली २५ रुपयांना मिळेल. तर अर्धा लीटरची बाटली ८ आणि पाव लीटरची बाटली केवळ ५ रुपयांना मिळेल.
रिलायन्सनं कॅम्पा श्युअर कंपनीचं कॅम्पेन सुरु केलं आहे. यामुळे बिस्लेरी, किनले आणि ऍक्वाशुअर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अनेक दशकांपासून या कंपन्यांचं बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेवर वर्चस्व आहे.