
सरन्यायाधीश गवई यांनी सांगितली मनातली गोष्ट…
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात वकिलांच्या एका गटाशी झालेल्या चर्चेत त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कोणत्या निर्णयाचे समाधान वाटते, याबद्दल भाष्य केले.
यावर्षी मे महिन्यात सरन्यायाधीशपदाची सूत्र घेतलेले सरन्यायाधीश गवई नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत. अवघे सहा महिने त्यांना सरन्यायाधीशपदाची संधी मिळाली. मात्र त्यांनी यापूर्वी घेतलेल्या एका निर्णयाचा उल्लेख केला आहे.
वकिलांच्या गटाशी चर्चा करत असताना गवई यांनी बुलडोजर निकालाचा उल्लेख केला. हे प्रकरण मानवी समस्येशी संबंधित होते. न्यायाधीश केवी विश्वनाथन यांच्यासह गवई यांनी या प्रकरणाचा निकाल दिला होता. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले की, बुलडोझर न्याय ही एक अराजक परिस्थिती आहे.
सरन्यायाधीश गवई म्हणाले की, बुलडोझरशी निगडित निकाल हा आमच्या दोघांच्याही मनाला समाधान देणारा होता. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी मानवीय समस्या आणि मानवाने निर्माण केलेल्या समस्या होत्या. एक व्यक्ती आरोपी किंवा संशियत आरोपी आहे म्हणून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला यातना भोगाव्या लागत होत्या.
बुलडोझर प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने संबंध देशभरासाठी काही नियमावली घालून दिली. तसेच बुलडोझर न्याय हा संविधान आणि मानवतेविरोधात असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
न्यायाधीश विश्वनाथन यांनाही दिले श्रेय
या निकालाचे श्रेय न्यायाधीश यांचेही तेवढेच आहे, असेही सरन्यायाधीश गवई म्हणाले. “या निकालाचे श्रेय मला दिले गेले. पण मला वाटते, माझे सहकारी आणि खंडपीठात त्यावेळी बरोबर असलेले न्यायाधीश विश्वनाथन यांचाही या निकालात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांनाही तेवढेच श्रेय जाते”, असे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.
तसेच सरन्यायाधीश असताना न्यायिक कामावर कोणताही परिणाम होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सरन्यायाधीश असताना न्यायिक कामावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. आपल्याकडे न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश संजीव खन्ना हे अडीच महिन्यांसाठी सरन्यायाधीश होते, पण तरीही या काळात त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. न्यायदान आणि न्यायिक प्रशासनातील उत्तम कामासाठी ते ओळखले जातात.
सरन्यायाधीश गवई पुढे म्हणाले, न्यायदानाचे काम करत असताना देशातील न्यायव्यवस्थेच्या मुलभूत संरचनेत सुधार आणण्यासाठी मी प्रयत्न केले. उच्च न्यायालयातील रिक्त जागा लवकर भरल्या जाव्यात, यासाठी माझे प्रयत्न आहेत.
नागपूरमधील वकिलीच्या दिवसांची काढली आठवण
वकिलांना मार्गदर्शन करत असताना सरन्यायाधीश म्हणाले, १९९० च्या दशकात नागपूरमधून वकिलीला सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही ४०-५० वकिलांचा एक छोटा गट तयार केला आणि आम्ही दर शुक्रवारी संध्याकाली भेटायचो. एखादा विषय ठरवून आम्ही त्यावर संशोधन करायचो आणि त्यावर सांगोपांग चर्चा करायचो. अशाप्रकारे आम्ही कायदा शिकण्यास सुरुवात केली.
कायदा हा आयुष्यभर शिकण्याचा व्यवसाय आहे. ज्यादिवशी तुम्ही मानता की, तुम्हाला सर्वकाही माहीत आहे, त्या दिवशी तुमच्या वकील किंवा न्यायाधीशपदाच्या कारकिर्तीदीतील शेवटचा दिवस असेल.