पालघर प्रतिनिधी:- मिलिंद चुरी
तारापूर: पालघर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमित व सुरळीत सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला असला, तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. तारापूर गावातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या भागेश्री गॅस वितरकाच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांना सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदू-राणी जाखड़ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू राहील, असे संबंधित कंपन्यांनी प्रशासनाला कळविले आहे.
मात्र मार्च २०२६ च्या सुरुवातीला घरगुती एलपीजी (१४.२ किलो) सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ होऊन तो ९१८ रुपये झाला आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरची किंमत १८४९.५० रुपये झाली आहे. याशिवाय महिन्याला मिळणाऱ्या सिलेंडरच्या वितरणातील अंतर १५ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात सध्या एकूण १२ लाख ५३ हजार ७५४ एलपीजी कनेक्शन असून त्यापैकी १ लाख २२ हजार १६४ कनेक्शन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत. जिल्ह्यात इंडियन ऑईलचे १३, हिंदुस्थान पेट्रोलियमचे १८ आणि भारत पेट्रोलियमचे २६ असे एकूण ५७ वितरक कार्यरत आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि ऑईल कंपन्यांची बुधवारी बैठक घेण्यात आली. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठा व वितरणात कोणतीही अडचण नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात काही अडचणी निर्माण झाल्याची नोंद करण्यात आली.
तथापि, तारापूर येथील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या भागेश्री गॅस वितरकाच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. एलपीजी सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना उन्हात उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
