नितीन गडकरींच्या हस्ते अक्कलकोटमध्ये २७८४ कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन…
सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चार महामार्गांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन गुरुवार, १४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता अक्कलकोट नविन बस स्टँडच्या आवारात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
यावेळी सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रियांक खर्गे, बी. आर. पाटील, दिपक वैद्य, राज्यसभा सदस्य डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभा सदस्य धाराशिव ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रणिती शिंदे, आमदार दिलीप सोपल, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार सुभाष देशमुखआमदार विजय देशमुख, यांच्या सह सर्व आमदार, सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.उद्याच्या कार्यक्रमात वागदरी – अक्कलकोट – तोळनूर मार्गाचे पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरण, मोहोळ – बसवनगर – वळसंग मार्गाचे विस्तारीकरण, दुधनी येथील रेल्वे उड्डाण पूल तसेच बोरी उमरगे येथे बोरी नदीवरील पूल उभारणी अशा विविध विकासकामांमुळे सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.
एकूण १३४ कि.मी. लांबीच्या आणि तब्बल ११३२ कोटी रुपयांच्या या विकास प्रकल्पांमुळे ग्रामीण व शहरी भागांतील संपर्क अधिक मजबूत होऊन उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवासाला मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी अधिक वेगाने जोडला जाणार असून व्यापार, उद्योग, पर्यटन आणि कृषी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. सूरत – चेन्नई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. गुजरातमधील सूरतपासून तमिळनाडूतील चेन्नईपर्यंतचा हा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाला जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
नाशिक-अक्कलकोट मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील संपर्क अधिक गतिमान होणार आहे. तसेच वागदरी अक्कलकोट आणि अक्कलकोट तोळणूर मार्गामुळे कर्नाटक सीमावर्ती भागाशी जोडणी मजबूत होणार आहे. मोहोळ ते वळसंग हा मार्ग तर सोलापूर जिल्ह्यासाठी बाह्यवळण रस्ता म्हणून महत्त्वाचा ठरणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे. या महामार्गांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागले आहेत.
सोलापूर जिल्हयातील प्रकल्पांचे भूमिपूजन
१)हसापूर ते बडदाल रा.म.क्र. १५० सी चे ग्रीनफिल्ड अलाईनमेंटचे सहापदरीकरण करणे (पॅकेज-१४ अक्कलकोट-कुर्नूल) (लांबी ३६.४० कि.मी. प्रकल्प खर्च १५५२ कोटी)
२)वागदरी – अक्कलकोट-तोळणूर रा.म.क्र. ५४८ बी चे पेव्हड् शोल्डरसहीत दुपदरीकरण करणे (लांबी ४७.६६ कि.मी. प्रकल्प खर्च ३५३ कोटी)
३)मोहोळ – बसवनगर वळसंग रा.म.क्र. ४६५ चे पेव्हड् शोल्डरसहीत दुपदरीकरण करणे (लांबी ८२ कि.मी. प्रकल्प खर्च ७५६ कोटी)
४)दुधनी येथे रेल्वे उड्डाण पुल बांधणे व ४.१२२ कि. मी. उर्वरित लांबी रा.म.क्र. १५० ई चे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण करणे. (लांबी ४.१२ कि.मी. प्रकल्प खर्च ९७ कोटी)
५)रा.म.क्र. 150 ई – बोरी उमरगे येथे बोरी नदीवर मोठे पुल बांधणे (लांबी 0.75 कि.मी.। प्रकल्प खर्च 26 कोटी)
(एकूण प्रकल्पांची लांबी १७१ कि.मी. एकूण प्रकल्पांचा किंमत २७८४ कोटी)
