ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील तलाठी कार्यालय, ता. कल्याण जि. ठाणे येथे कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ₹५,००० लाचेची मागणी करणाऱ्या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ठाणे यांनी रंगेहात पकडल्याची कारवाई १० मार्च २०२६ रोजी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पेशाने वकील असून त्यांच्या अशिलाच्या मौजे मोहने (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील सर्व्हे नं. ४५ व ४६/७ या जमिनीच्या वादासंदर्भात तहसील कार्यालय, कल्याण येथे दावा दाखल करण्यासाठी संबंधित फेरफार नोंदी व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती आवश्यक होत्या. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, कल्याण येथे अर्ज केला होता.
सदर अर्ज तलाठी कार्यालय, आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे येथे पाठविण्यात आला. यावेळी कार्यालयातील खाजगी इसम निलेश हनुमान पवार (वय ३५ वर्षे) यांनी रेकॉर्ड शोधून काढण्यासाठी “चहापाणी” म्हणून ₹४,००० ते ₹५,००० लाचेची मागणी केली.
तक्रारदारांनी याबाबत ACB ठाणे येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानुसार १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११.२५ वाजता सापळा रचून आरोपी निलेश पवार याला ₹५,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ACB कडून देण्यात आली.


