ठाणे प्रतिनिधी -नागेश पवार
मागील दोन-अडीच वर्षांपासून मुंब्रा आणि दिवा परिसरात बंद घरांना लक्ष्य करून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या एका सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे शाखा (युनिट-१) ने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपीकडून १ कोटी ३९ लाख रुपये किमतीचे १.०३ किलो (एक किलो तीस ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
शिवाजी गोपाळ संते (वय ३१, रा. टिटवाळा, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
असा लागला छडा:
दिवा आणि मुंब्रा परिसरात बंद घरांचे कुलूप किंवा खिडकीचे ग्रिल उचकटून चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक-१ चे पथक समांतर तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी अत्यंत चलाख होता; चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून तो जाणीवपूर्वक विरुद्ध दिशेने प्रवास करत असे.
मात्र, गुन्हे शाखेचे अंमलदार संदीप महाडिक, प्रशांत लवटे, अमोल धावरे आणि सागर सुरळकर यांनी सलग १५ दिवस तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. खबऱ्यांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी शिवाजी संते याला २ मार्च रोजी टिटवाळा येथून अटक केली.
गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi):
आरोपी हा बंद घरांची टेहळणी करायचा. त्यानंतर घराच्या बाथरूमची किंवा खिडकीची लोखंडी ग्रिल आणि मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा लोखंडी रॉडच्या साहाय्याने उचकटून तो घरात प्रवेश करत असे. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याने केलेले तब्बल ४८ गुन्हे पोलिसांनी निष्पन्न केले आहेत. या आरोपीवर यापूर्वीही कल्याण तालुका आणि उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “येत्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत असल्याने अनेक नागरिक गावी जातात. अशा वेळी घरे बंद असतात आणि चोरटे याचाच फायदा घेतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक नेमावेत आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आवर्जून बसवावेत,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या पथकाने केली कारवाई:
ही धडक कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंग जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे, सपोनि सुनिल माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

