
वडनेर गेट येथून नरभक्षक बिबट्याने आई-वडिलांदेखत ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह अखेर आर्टिलरी सेंटरच्या पाण्याच्या टाकीजवळ श्वान पथकाने शोधून काढला. तब्बल १७ तास सलग ३०० हून अधिक लष्करी जवान व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शोधमोहिमेला अखेर यश आले.
वडनेर गेट (आर्टिलरी सेंटर) येथील कारगिल गेटजवळच जवानांचे क्वार्टर आहे. तेथे दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर या लहान मुलाला मंगळवारी (दि.२३) रात्री ९.३० वाजता बिबट्याने आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत ओढून नेले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या परिसरात लष्करी जवान, वनविभागाचे कर्मचारी थर्मल ड्रोन व श्वानपथकाच्या सहाय्याने चिमुकल्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते.
वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील दोनवर्षीय त्याच्याबरोबर श्रुतिक सायंकाळच्या वेळी घराबाहेर खेळत होता. आईवडीलही होते.
दोघे घरात जाताच जवळच्याच झुडपांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. मुलाच्या रडण्याच्या आवाजामुळे पालक बाहेर आले. त्यांच्यासमोरच बिबट्या त्यांना जाताना दिसला. त्यांनी तत्काळ त्याच्यामागे धाव घेतली. सुमारे एक ते दीड किलोमीटर पाठलाग केला. वसाहतीच्या भितींवरून बिबट्याने बाहेर झेप घेतली आणि तो क्षणार्धात नाहीसा झाला. त्यानंतर आर्टिलरी सेंटरचे लष्करी जवान व वनविभागाने रात्रीपासूनच मोठी शोधमोहीम सुरू केली होती.
पावसामुळे परिसरात झालेल्या चिखलामुळे शोधमोहिमेस अडथळे निर्माण होत होते. मात्र तरीही शोधमोहीम सुरू होती. सकाळी ७ पासूनच पुन्हा नव्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी आर्टिलरी सेंटरच्या पाण्याच्या टाकीजवळ चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पंचनामा करून उत्तरीय तपासणी व पुढील कार्यवाही वनविभागाकडून करण्यात आली.
आर्टिलरी सेंटरचे लष्करी जवान, वनविभाग पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ त्यांचे पथक, स्थानिक माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार, विक्रम कोठुळे यांच्यासह स्थानिकांनी या शोधमोहिमेमध्ये भाग घेतला.
कपारीत आढळला मृतदेह
आर्टिलरी सेंटरच्या पाण्याच्या टाकीजवळील कपारीत चिमुकल्याचा मृतदेह सापडला. बिबट्याने त्या मृतदेहास झाडाचा पाला टाकून झाकून ठेवलेले होते. मात्र श्वानाने पथकाला मार्ग दाखवित मृतदेहापर्यंत नेले.
दोन महिन्यांत दोन चिमुकल्यांचा मृत्यू
विशेष म्हणजे ८ ऑगस्ट रोजी वडनेर दुमाला येथे आयुष किरण भगत या तीन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या परिसरामध्ये पिंजरे लावण्यात आले होते. त्याचबरोबर जनजागृती, थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दोन बिबटे पिंजऱ्यामध्ये सापडले होते. मात्र तरीही या परिसरामध्ये बिबट्यांचा उच्छाद अजनही सरूच आहे.