
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे.
शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून निधी संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज्यभरातील पदाधिकारी आणि शिवसैनिक हजर राहणार नाहीत. हे सर्व पदाधिकारी पूरग्रस्त भागात मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. त्यांनी राज्यातील शेतकरी पावसामुळे आणि पुरामुळे अडचणीत असून त्यासाठी शिवसेनेकडून निधी संकलित केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच यंदाचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे भव्य होणार नसून यात केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शिवसैनिक हजर राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
नुकसानीची माहती मिळाल्यानंतर ठोस निर्णय घेऊ
एकनाथ शिंदे यांनी राज्यातील परिस्थितीवर बोलताना म्हटले की, ‘राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांवर खूप मोठं संकट आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभ राहणार आहे, आज कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. संकट मोठं आहे, त्यामुळे सरकार हात आखडता घेणार नाही. जवळपास 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. पुढच्या काही दिवसात संपूर्ण पिकांचे आकडे येतील. दोन-तीन दिवसात संपूर्ण माहिती आल्यानंतर आम्ही चर्चा करुन शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. शेतकऱ्यांना मदत करताना अटी,शर्थी,नियम बाजूला ठेवून मदत केली जाईल.
शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना
जिथे आपत्ती, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. एकनाथ शिंदे तिथे धावून जातो. आपल्या लोकांना मदत केली पाहिजे ही त्यामागील भावना आहे. हे खऱ्या अर्थाने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आहे. पूरपरिस्थिती असलेल्या भागातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला मुंबईत न बोलवता. आमच्या यंत्रणांच्या माध्यमातून तुम्ही शेतकर्यांच्या घरात जाऊन, बांधावर जाऊन मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.