पालघर प्रतिनिधी :- मिलिंद चुरी
पालघर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर महिलांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला व विद्यार्थिनींना समाजात सक्षम स्त्री म्हणून कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थिनी खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पालघरच्या उपजिल्हाधिकारी सीमा राऊत उपस्थित होत्या. याशिवाय आर्यन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उपेंद्र घरत, मुख्याध्यापिका विभूती मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मयूर कोल्लम, अमृत घाडगे, निलेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या संघांना तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ऑलिम्पिक पदक विजेते मल्लवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचेही वितरण करण्यात आले.
या उपक्रमातून महिलांमध्ये क्रीडाप्रेम वाढविण्यासह समाजात आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला.
