
‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष खासदार अससुद्दीन ओवेसी यांची आज, मंगळवारी सायंकाळी नगरमध्ये होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी दिल्यानंतरही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली.
रद्द झालेल्या सभेवरून ‘एमआयएम’ व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झडले. विशेष म्हणजे एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजिद यांनी पोलिसांनीच संस्थेमुळे शहरातील वातावरण खराब होऊ शकते, असे सांगत सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्याने, आम्ही सभा रद्द केल्याचा दावा केला आहे.
एमआयएमचे प्रमुख खासदार ओवेसी यांची शहरात पूर्वनियोजित सभा होती. दरम्यान काल, सोमवारी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर ओवेसी यांची सभा होणार की नाही, याबद्दल आज सकाळपर्यंत संदिग्धता होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हेही या पार्श्वभूमीवर रात्रीच नगरमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी रात्रीच सभास्थळाची पाहणी केली. अखेर आज, मंगळवारी सकाळी सभेस सशर्त परवानगी देण्यात आली.
सभा शांततेत पार पाडावी यासाठी तिथून चिथावणीखोर व इतर धर्मियांच्या भावना दुखावतील, अशा पद्धतीने वक्तव्य करू नये, धनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा पाळावी आदी स्वरूपाच्या अटी घालण्यात आल्या होत्या तसेच एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह विरुद्ध बाजूनेही एकूण सुमारे १०० हून जणांना अधिक जणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
त्यानुसार सभेची तयारीही सुरू करण्यात आली. मुकुंदनगर भागात व्यासपीठ उभाण्यात आले. प्रेक्षकांसाठी खुर्च्याही टाकण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. सभा सायंकाळी ७ वा. होती. तत्पूर्वी खासदार ओवेसी दुपारी ३ वा. नगरमध्ये येऊन वक्फ बोर्डाच्या प्रश्न संदर्भात उलेमांची बैठक घेणार होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अश्रफी व माजी नगरसेवक समद खान हेही ओवेसी यांचा दौरा, सभा होणारच असे सांगत होते. मात्र, अचानक दुपारी २.३० च्या सुमारास सभा रद्द करण्यात आल्याचा निरोप मिळाला.
सभा पुन्हा होईल
संदर्भात बोलताना एमआयएमचे प्रदेश महासचिव समीर साजिद यांनी सांगितले की, महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांनी खासदार ओवेसी यांना दूरध्वनी करून सभा पुढे ढकलण्यास सांगितले. गोपनीय अहवालाच्या आधारावर सभेनंतर नगरचे वातावरण खराब होऊ शकते, असे पोलीस सांगत होते. आम्हाला सभेच्या परवानगीचे पत्र दिले तरी प्रत्यक्षात खासदार ओवेसी यांना वेगळेच सांगितले गेले. त्यानंतर ओवेसी यांनी आपण शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने जाणारे आहोत, वातावरण खराब होणार असेल तर सभा पुन्हा नंतर घेऊ, असे कळवले.
त्यामुळे सभा पुढे ढकलली. काल घडलेल्या घटनेनंतर आमच्या पुढे विनाकारण अटक केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोडवण्याचे प्राधान्य आहे. आज रद्द झालेली सभा पुन्हा होईल, खासदार ओवेसी पुन्हा केव्हाही नगरमध्ये येऊ शकतात. यावेळी पक्षाचे पदाधिकारी शफी उल्लाह काझी, डॉ. अश्रफी, अंजा खान, समद खान, समीर शेख, खालीद शेख आदी उपस्थित होते.