
इस्रायल सतत गाझा पट्टीत हल्ले करत होते, त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात याबाबत बैठक झाली आहे.
या नंतर ट्रम्प यांनी 72 तासांच्या आत ओलिसांची सुटका करण्याचे आवाहन करणारी एक शांतता योजना जाहीर केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेला भारतासह अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. मात्र हमासने ही योजना स्वीकारली की नाही हे अद्याप समोर आलेले नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांची शांतता योजना काय आहे?
भारतासह जगभरातील देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता ट्रम्प यांनी इस्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी 20 कलमी योजना सादर केली आहे. या योजनेनुसार ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक तात्पुरती प्रशासकीय मंडळ स्थापन केले जाणार आहे. यात माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश असेल. ही योजना इस्रायल आणि हमासने स्वीकारली तर युद्ध ताबडतोब संपेल. तसेच इस्रायलला 72 तासांच्या आत ओलिसांची सुटका करावी लागेल. मात्र हमासने ही योजना स्वीकारली नाही तर त्यांचा पराभव करण्यासाठी अमेरिका इस्रायलला पाठिंबा देणार आहे.
भारतासह या देशांचा शांतता योजनेला पाठिंबा
भारताने ट्रम्प यांच्या या योजनेला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या या योजनेचे स्वागत केले. पंतप्रधान म्हणाले की, ‘सर्व संबंधित पक्ष ट्रम्प यांच्या पुढाकारामागे एकत्र येतील आणि संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठीच्या या प्रयत्नांना पाठिंबा देतील.
जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया आणि इजिप्त या देशांनीही ट्रम्प यांच्या या शांतता योजनेचे स्वागत केले आहे. तसेच फ्रान्स, इटली, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन कौन्सिलनेही ट्रम्प यांच्या योजनेला पाठिंबा दिला आहे. या सर्व देशांनी हे युद्ध लवकरात लवकर थांबावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान या युद्धात आतापर्यंत 66 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात 1,68,162 पॅलेस्टिनी जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे.