
भारतीय लष्कराला किती लाखांची मदत मिळेल…
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दुबईत टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले. आशिया कप 2025 वर भारताचे नाव कोरले. हा चषक जिंकल्यानंतर यादवने संपूर्ण सामना शुल्क भारतीय लष्कराला आणि पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर सूर्याने याविषयीची माहिती दिली. त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. एका सामन्यासाठी सूर्यकुमार किती घेतो शुल्क?
सूर्यकुमार यादव किती घेतो शुल्क?
वृत्तानुसार, प्रत्येक भारतीय खेळाडूला एका T20 सामन्यासाठी जवळपास 4 लाख रुपये शुल्क मिळते. सूर्यकुमार यादव याला ही इतकी रक्कम मिळते. या आशिया कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एकूण 7 सामने खेळले. त्या हिशोबाने त्याची एकूण 28 लाखांची कमाई झाली. ही मदत आता थेट भारतीय लष्कर आणि पीडित कुटुंबियांना देण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या या पुढाकाराची देशभरात चर्चा सुरू आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार?
आशिया कप जिंकल्यानंतर सूर्याने माध्यमांशी संवाद साधला. मी व्यक्तिगत सर्व 7 सामन्यांचे शुल्क भारतीय लष्कराला देणार आहे. थोडा उशीर झाला. पण मी जे हे योगदान देत आहे. त्याचा मला अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
अंतिम सामन्यात धमाकेदार विजय
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केले. या विजयात भारतीय संघाच्या सर्व खेळाडूंचे योगदान दिसले. तिलक वर्माने जबरदस्त अर्धशतक ठोकले. संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी भारतीय संघाला सावरले. या विजयासह भारताने दुसरा T20 आशिया कप आणि एकूण 9 वेळा आशिया कप जिंकला.
ट्रॉफी घेतलीच नाही
आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) मुख्य आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) संचालक मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्ऱॉफी घेण्यास नकार दिला. संयुक्त अरब अमिरातच्या क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष खालिद अल जरुनी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास भारतीय संघ तयार झाला. पण नंतर आयोजकांनी ट्रॉफी मंचावरून हटवली. तर नकवी हे ट्रॉफी आणि मेडल घेऊन हॉटेलकडे पळाले.