
खैरे-दानवेंनी ठरवलयं सोन्यासारख बोलायचंच नाही…
मुंबईच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला ऐतिहासिक राजकीय परंपरा लाभली आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या 3 वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवली आहे.
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांना एकजुटीचा संदेश देतात. पण या संदेशाकडे शिवसेनेतील काही नेतेच कसे दुर्लक्ष करतात याचा अनुभव कालच्या व्यासपीठावर माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार अंबादास दानवे यांच्यातील टशन मधून आला.
दसऱ्याचं सोनं म्हणून अंबादास दानवे व्यासपीठावरील सगळ्या नेत्यांना आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देत होते आणि त्यांचे आशीर्वादही घेत होते. पण याच रांगेत बसलेल्या पक्षातील वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना मात्र दानवे यांनी आपट्याची पान दिलं नाही अन् शुभेच्छाही दिल्या नाहीत, ते सरळ पुढे निघून गेले. दुसरीकडे चंद्रकांत खैरे मात्र व्यासपीठावर सगळ्या नेत्यांना आपट्याची पाने देत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसले. मुंबईतील लहान असो की मोठा सरसकट सगळ्या नेत्यांच्या पाया पडण्याच्या सवयीवरून चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची झोडही उठवली जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कालही वयाने आपल्यापेक्षा लहान असलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपट्याची पानं देत चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे चरण स्पर्श केले.
एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि पक्षाचे प्रमुख म्हणून चंद्रकांत खैरे वयाचा विचार न करता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचा सन्मान करतात. तर दुसरीकडे ज्या खैरे यांच्या नेतृत्वाखाली अंबादास दानवे यांची राजकीय वाटचाल सुरू झाली त्याच खैरेंना सार्वजनिकरित्या पाण्यात पाहतात.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात, शिवसेनेत चंद्रकांत खैरे यांचा गेली अनेक वर्ष दबदबा कायम होता. शाखाप्रमुख, नगरसेवक, 2 टर्म आमदार, राज्याचे मंत्री, सलग 4 टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांच्या पक्षनिष्ठेची उदाहरणं शिवसेनेत आजही दिली जातात. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर नाकारत मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, उद्धव ठाकरे यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही,असे ठणकावत खैरे यांनी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यावरची निष्ठा दाखवून दिली होती.
दुसरीकडे विधान परिषदेची आमदारकी आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाची मिळालेली संधी याची हवा अंबादास दानवे यांच्या डोक्यात गेल्याची चर्चा आणि आरोप चंद्रकांत खैरे समर्थक शिवसैनिकांकडून केला गेला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवर दावा सांगणाऱ्या अंबादास दानवे यांनी माझे कामच केले नाही असा जाहीर आरोप आणि तक्रारही चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तेव्हापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खैरे आणि दानवे हे सहसा समोरासमोर येत नाहीत.
मुंबईतील नेते विशेषत: उद्धव किंवा आदित्य ठाकरे जिल्हा मराठवाडा दौऱ्यावर आले की, खैरे त्यांच्यासोबत दिसतात. इतर वेळी सध्या जिल्ह्याची सर्व सूत्र हाती आलेले अंबादास दानवे आपल्याला पक्षाच्या बैठका, कार्यक्रमाला बोलवत नाही, असा आरोप करत खैरे त्यांच्यापासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. खैरे – दानवे यांच्यातील वर्चस्वाची लढाई आणि कुरघोडीचे राजकारण हे आजचे नसून अगदी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईचे पालकमंत्री देण्यापासून सुरू आहे.
रामदास कदम जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा पहिल्यांदा पक्षात जातीपातीचे राजकारण सुरू झाले. मराठा विरुद्ध इतर अशा कुरघोडीच्या राजकारणातून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे असे दोन गट पडले. हे गट उघडपणे आजही कार्यरत आहेत. शिवसेना पक्ष फुटला, लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा जिल्ह्यात सफाया झाला. मात्र यातून कुठलाही बोध किंवा धडा न घेता पक्षाच्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील दोन नेत्यांमधील कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे.
वारंवार मुंबईत बोलवून खैरे-दानवे यांना समज देऊनही फारसा उपयोग होत नाही, असे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही या दोघांमधील वादाकडे फारसे गांभीर्याने न पाहण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. खैरे यांची निष्ठा आणि अंबादास दानवे यांचे संघटन कौशल्य या दोन्हींची पक्षाला गरज असल्यामुळे उद्धव ठाकरे दोघांनाही तेवढाच मान सन्मान देतात. स्थानिक पातळीवर मात्र खैरे दानवे यांच्यातील कुरबुरी सुरू आहेत, त्या यापुढेही सुरूच राहतील असे चित्र दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरील अंबादास दानवे यांच्या कृतीतून स्पष्ट होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक जबाबदारी सोपवली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद आणि सदस्यत्वाची मुदत संपल्यामुळे अंबादास दानवे यांच्याकडे आता संघटना बांधणीसाठी भरपूर वेळ आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसेच ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.
या मोर्चाची तयारी आणि जबाबदारी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर त्यांनी एकत्रितपणे सोपवली. यातून उद्धव ठाकरे दोघांनाही एकाच पातळीवर पाहतात हे पुन्हा एकदा दिसून आले. असे असले तरी पक्षाची सगळी सूत्र आपल्याच हाती ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यातून खैरे यांना डावलण्याचे प्रकार अंबादास दानवे यांच्याकडून वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा दानवे “लै काड्या करतो” अशी खैरे यांची तक्रार पुढील काही दिवस आणखी ठाकरे यांना ऐकायला लागू शकते हे नक्की.