
एक सत्याचा लढा आज हरले. नितीन गडकरी आणि अतुल शिरोडकर जिंकले. फक्त ढसा ढसा रडावेसे वाटत आहे, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. आज झालेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत अंजली दमानिया यांना अंतरिम दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या, आज हाय कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम दिलासा दिला नाही. म्हणजे आज या सगळ्या लोकांची घरे, जी त्यांनी कष्टाच्या पैशांनी विकत घेतली होती, ती एक असा माणूस तोडणार जो फक्त गडकारींचा बिझनेस पार्टनर आहे, म्हणून जिंकला. खरेच या लढ्याला उपयोग आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फक्त ढसा ढसा राडावेसे वाटत असल्याचे देखील त्यांनी भावना व्यक्त केल्या. पुढे त्यांनी लिहिले की, गडकरी तुमच्या कर्माची फळे तुम्हाला याच जन्मात भोगावी लागतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हे नेमके प्रकरण काय आहे, याची माहिती अंजली दमानिया यांनी 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये आपल्याला मिळते. यात त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती समजाऊन सांगितली आहे. प्रकरण थोडक्यात असे आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा व्यावसायिक मित्र अतुल शिरोडकर यांना भांडुपमधली जमीन केवळ 89 लाखात गडकारींनी मिळवून दिली असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विट नुसार, नितीन गडकरी यांचा व्यावसायिक मित्र असलेला अतुल शिरोडकर यांना सगळेच्या सगळे कायदे धाब्यावर बसवून एसीएस वळसा नायर आणि एसीएस असीम गुप्ता यांना गडकारींनी थेट फोन करून, मित्राला 4 एकर भांडुपमधली जमीन केवळ 89 लाखात मिळवून दिली. या दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण जे करतोय ते चुकीचे आहे, पण त्यांच्यात कायद्याने काम करायची हिंमत नाही. 89 लाखात भांडुपमध्ये आता 2बीएचके चे घर येत नाही. पण गडकरींच्या मित्राला हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळाला, अशी माहिती त्यांनी दिली.
एसआरए हा राजकारण्यांचा अड्डा
पुढे अंजली दमानिया एसआरए हा राजकारण्यांचा अड्डा कसा झाला आहे यावर माहिती देताना लिहितात, साईनगर भांडुप ही 660 घरांची वस्ती. अतिशय स्वच्छ चाळी. 1991-92 मध्ये या 200 ते 250 फुटाची घरे एका जमीन मालकाने बांधली आणि घर व त्या खालची जमीन ही 660 कुटुंबांना विकली. तुम्ही सोसायटी झाली की मी कन्वेयन्स करेन असे मालकाने सांगितले. सुखाने ही माणसे राहत होती.
2007 मध्ये याच मालकाने हीच जमीन अतुल शिरोडकर या इसमाला 2 कोटी रुपयाला विकली. 2 कोटी पैकी फक्त 89 लाख त्या शिरोडकरने दिले. पण पैसे मिळतीलच असे समजून त्या मालकाने कन्व्हेयन्स शिरोडकरच्या नावाने केले. 2009 मधे या लोकांना कळले तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली. पण गडकरी या शिरोडकरचे मित्र, त्यात आमदार सुनील राऊत मित्र मग काय विचारा. सर्व्हेला 660 पैकी 300 घरे बंद दाखवली, खोटी कॉनसेंट दाखवली, खोटे कागदपत्र केले. अनेक्शर I, अनेक्शर II आणि अनेक्शर III, तिन्ही बनावट. ना प्लॅन धड, ना शिरोडकरांची आर्थिक स्थिती धड.
सुनावणी घेणारे एजीआरसी खरेतर 5 लोकांचे असते. न्याय व्हावा म्हणून. आमच्या केस मध्ये 5 पैकी 3 जण नव्हते, असीम गुप्तांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, पण अश्विनी जोशी यांनी डिसेंट ऑर्डर दिली. पण तरीही 4 जणांचा निर्णय एकतर्फी आहे असे खोटे दाखवून 33/38 ची नोटीस काढली.
अंजली दमानिया यांनी या लढ्यात कधी उडी घेतली, याविषयी माहिती देताना अंजली दमानिया लिहितात, एप्रिल 2024 पासून मी या लढ्याला सुरुवात केली. यांना न्याय मिळावा म्हणून माझा स्वाभिमान बाजूला ठेऊन, याच वर्षी एप्रिलमध्ये मी दिल्लीला जाऊन गडकारींची भेट घेतली. तेव्हा योगायोगाने संजय दिना पाटील पण भेटले, ते देखील माझ्यासोबत आले. पण काहीही झाले नाही.
सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला
पुढे अंजली दमानिया यांनी माहिती दिली की, मुंबईतील सुनील राऊत यांच्याशी दोन वेळा बोलले, संजय राऊत यांच्या सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेट घेतली. सगळ्यांकडे न्यायची भीक मागितली. पण काहीही झाले नाही. 100 वेळा फडणवीस यांना विनंती केली. एकनाथ शिंदेंना भेटले. तेही वळसा नायर यांच्याशी बोलले. आशिष शेलार यांना भेटलो, त्यांनी असीम गुप्ता यांना फोन केला. तसेच एजीआरसीमध्ये स्वतः हजर होऊन जीव तोडून कढले, पण 11 सप्टेंबरला गडकरी जिंकले. सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला. इथे राहणारी माणसे अतिक्रमण करून घुसखोरी करणारी नव्हती, ही घरे त्यांची स्वतःची होती. त्यांनी एसआरए काडीपेट्यांच्या घरात का राहावे? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता.