
गणेश नाईकांच्या शिलेदारांपुढे शिवसेना प्रवेशाशिवाय पर्यायच ठेवला नाही !
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या प्रभागरचनांमध्ये जुने प्रभाग फुटले आहेत. वनमंत्री गणेश नाईक समर्थक नगरसेवकांना या बदलांचा मोठा फटका बसला आहे. यावर मोठ्या प्रमाणात आक्षेपही नोंदवले आहेत.
परंतु रचनेमध्ये बदल झाले नाहीत, तर काही नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय पर्यायच नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत घोडेबाजार रंगणार असल्याची चर्चा रंगली आहे.
नवी मुंबई महापालिकेची जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. या प्रभागरचनेवर उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांचा प्रभाव प्रभाव असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून केला जात आहे. 4 नगरसेवकांचा 1 प्रभाग तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये विचित्र पद्धतीने प्रभागांची रचना केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजपच्या नगरसेवकांना बसला आहे.
यावर हरकती नोंदवण्याच्या प्रक्रियेत भाजपकडून सर्वात जास्त हरकती घेण्यात आल्या आहेत. प्रभागांची रचना, नकाशा व्याप्तीनुसार नसल्याच्या जवळपास 500 पेक्षा जास्त हरकती भाजपकडून घेण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यावर सुनावणी अपेक्षित आहे. मात्र बदल न झाल्यास नगरसेवकपदावर पाणी सोडावे लागेल, ही बाब अनेकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे आडबाजूने शिवसेनेच्या नेत्यांसोबत हातमिळवणीची चर्चा आहे.
दोन्ही पक्षांचे जिल्हाप्रमुख भिडले :
खुद्द शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी याबाबतचा दावा केला आहे. जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले, शिवसेनेत भाजपसहीत इतर पक्षातील 10 ते 12 नगरसेवक येण्यासाठी तयार आहेत. नाईक समर्थकांची आर्थिक, मानसिक कोंडी झाली आहे. जनहितांच्या कामासाठी अनेक जण शिवसेनेत येत आहेत.
नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी मात्र पाटकर यांचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, कोणत्या पक्षात कोणी जावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण प्रभागरचना आणि पक्षप्रवेशाचा काहीही संबंध नाही. हरकतीनुसार सुधारणा केल्या आहेत, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. आमच्या पक्षातील कोणत्याच कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनःस्थिती नाही.
कोणत्या प्रभागांना फटका?
ऐरोली, दिघा, रबाळे, तुर्भे या भागातील प्रभागांना अधिक फटका बसला आहे. तुर्भेमध्ये नव्याने 14 गावांचा समावेश केल्यामुळे नवी मुंबईतील क्षेत्रफळानुसार हा सर्वात मोठा प्रभाग झाल्याची चर्चा आहे. याशिवाय वाशी आणि सानपाडा एकत्र केले असून, रस्त्याच्या पलीकडे असणारा तुर्भे गावाचाही काही भाग जोडला गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जुईनगर, नेरूळ पूर्व आणि पश्चिम या परिसरातही प्रभागांची मोडतोड झाली आहे. सीवूड्सचा प्रभाग नेरूळला जोडण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गटातर्फे हरकत नोंदवण्यात आली आहे.
एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी पक्षाचा मेळावा संपल्यानंतर नवी मुंबईतील पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत गरजूंची मदत करा, ज्या नगरसेवकांची कामे होत नसतील, अशांना पक्षात घेऊन त्यांची कामे करा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना केल्याचे समजते. तसेच पक्ष वाढवण्यासाठी जे जमेल ते करा, असा सल्लाही दिला.