
ओबीसींचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा…
अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.
मोदींना टाटा बाय बाय करून देशाला वाचवा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तर सरसंघचालक मोहन भागवत शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी कधी गेलेत का? असा सवाल करत त्यांनी भागवतांवर देखील निशाणा साधला.
अकोल्यातील कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींचा घात संघ आणि भाजपने केला आहे. एवढं तरी ओबीसींनी डोक्यात घेतलं तरच ओबीसींचं आरक्षण वाचेल. स्थानिक पातळीवर ओबीसी नेतृत्वाला संधी देणारे आरक्षण आता हातातून जाण्याची शक्यता आहे. शिवाय फक्त राजकीय आरक्षण नव्हे तर शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाईल.
त्यामुळे ओबीसींनी वेळीच सावध व्हावं, असा इशारा त्यांनी यावेळी ओबीसी समाजाला दिला. तर मोदी विश्वगुरू नव्हे तर चपराशी असल्याची जहरी टीका देखील त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, ‘ट्रम्प हे मोदींना विश्वगुरू नव्हे तर चपराशी समजत असल्यामुळे त्यांनी अमेरिकेतून भारतीयांना हकलण्याचं धोरण स्वीकारलं आहे.
मोदींना जागतिक पातळीवर किंमत नसल्याने जगातील बहुसंख्य देश पाकिस्तानच्या बाजूने उभे राहत आहेत.’ दरम्यान, याच कार्यक्रमातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनाला गेलेत का?
असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘महिन्यातून एकदा अकोल्यात येणाऱ्या मोहन भागवतांनी अकोल्यापासून 35 किलोमीटर अतंरावर असणाऱ्या शेगावच्या गजानन महाराजांचं दर्शन का घेतलं नाही? गजानन महाराज सर्वसामान्य ओबीसींच श्रद्धास्थान असल्याने त्यांनी दर्शन घेतलं नाही.