CM फडणवीसांनीच दिले संकेत; अनेक नेत्यांच्या पोटात गोळा…
राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच आता प्रचार सभेच्या निमित्ताने नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. प्रचार सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात भाजप युवकांना संधी देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
राज्यात नगरपालीका व नगरपंचायतीची रणधुमाळी सुरु आहे. त्यानंतर लवकरच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो. त्यामुळे सर्वच पक्षाकडून प्लॅनिंग केले जात आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
राज्यात अनेक ठिकणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवण्यात येत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळेच या सर्व निवडणुकांपूर्वी राज्यात भाजप भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मुंबईमधील एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या युवा शक्तीवर विश्वास दाखवला जाणार आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही जास्तीत जास्त तरुणांना संधी देणार आहोत. आमचा पक्ष येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी 40 टक्के जागा या 35 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या तरुणांना देणार आहे. त्यासोबतच महिलांनाही संधी दिली जाणार आहे. ‘
दरम्यान, भाजपच्या (BJP) या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अनेक नेत्यांच्या पोटात गोळा येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीपासून ते महानगरपालिकेपर्यंतच्या सर्वच निवडणुकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये चिंता पसरली आहे.
दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील असाच निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सर्व नेत्यांना सूचना केली होती की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जास्तीत-जास्त तरुणांना संधी द्या, दरम्यान त्यानंतर आता भाजपकडून देखील असाच निर्णय घेण्यात आला आहे, याबाबत सीएम फडणवीस यांनी सूचक संकेत दिले आहेत.


