दै.चालु वार्ता वृत्तसेवा उदगीर, प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :
उदगीर : उदगीर तालुक्यातील हेर महसूल मंडळ विभागातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी शासनातर्फे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मौजे करडखेल पाटी (ता. उदगीर, जि. लातूर) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता एकदिवसीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्याच्या महसूल व वन विभागाने या अभियानाची सुरुवात केली आहे. नागरिकांना ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ (एकाच दिवसात सेवा) देण्याच्या हेतूने सर्व संबंधित अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहून सेवा देणार आहेत. शिबिरात ‘सिंगल विंडो’ (एक खिडकी) प्रणाली राबविण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये उपलब्ध प्रमुख सेवा
१) प्रलंबित फेरफार प्रकरणे :
सबळ कारणांशिवाय प्रलंबित राहिलेली फेरफार प्रकरणे शिबिराच्या दिवशी निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे.
२) अभिलेख दुरुस्ती व डिजिटल उतारे :
७/१२ मधील त्रुटींविषयी अर्ज स्वीकारण्यासाठी ‘अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क’ कार्यरत राहील. तसेच डिजिटल ७/१२ आणि ८अ उतारे तात्काळ उपलब्ध करून दिले जातील.
३) विविध प्रमाणपत्रांचे वितरण :
उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी/अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र आदींचे अर्ज स्वीकारून त्वरित वितरणाची सुविधा देण्यात येणार आहे.
४) अकृषिक (एन.ए.) मार्गदर्शन :
अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी परवानगी संदर्भातील बदल, संपुष्टात आलेली सनद देण्याची प्रक्रिया तसेच एकवेळ अधिमूल्य भरण्याची सुलभ पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.
५) इतर सेवा :
ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना तसेच तक्रार निवारण या सेवाही शिबिरात उपलब्ध असतील.
६) गाव दप्तर अद्ययावतीकरण :
भूसंपादन व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणांमध्ये कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही शिबिरादरम्यान पूर्ण केली जाणार आहे.
महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे एकाच ठिकाणी व तात्काळ पूर्ण करून घेण्यासाठी हेर महसूल मंडळ व परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांनी मौजे करडखेल पाटी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे शनिवार, दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ठिकाण : विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मौजे करडखेल पाटी, ता. उदगीर, जि. लातूर
दिनांक : शनिवार, ७ मार्च २०२६
वेळ : सकाळी १०.०० वा.
