कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी आता वाहतूक व्यवस्थेचा एक नवा ‘पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. या नव्या रचनेनुसार ‘खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) आणि सर्वात वर मेट्रो’ अशा ‘डबल डेकर’ (द्विस्तरीय) मार्गिका उभारण्यात येणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीए (MMRDA) मुख्यालयात नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित आणि प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि प्रकल्प:
१. ‘डबल डेकर’ मेट्रो आणि रस्ते प्रकल्प
मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व नवीन मेट्रो मार्गिका ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारण्यात येतील. ज्या ठिकाणी मेट्रो मार्गिका जाईल, तेथे खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो असे या प्रकल्पाचे स्वरूप असेल.
* समाविष्ट मार्ग: कल्याण-तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, आणि दुर्गाडी मार्गे कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ-चिखलोली (मेट्रो ५ अ).
* उन्नत मार्ग (Elevated Roads): शिळफाटा-रांजणोली आणि वालधुनी-नेवाळी उन्नत मार्ग देखील याच धर्तीवर उभारले जातील.
२. मेट्रो मार्गांचे मोठे विस्तारीकरण
सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा विस्तार करण्याबाबत एमएमआरडीएने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच याचा आराखडा तयार केला जाणार आहे:
* मेट्रो ५ ब: चिखलोली ते बदलापूर
* मेट्रो ५ क: दुर्गाडी ते टिटवाळा
* मेट्रो १२ ब: शिळफाटा ते मुंब्रा-कळवा मार्गे थेट ठाण्यापर्यंत जोडणी.
३. मेट्रो १२ च्या कामाला वेग
कल्याण-तळोजा (मेट्रो १२) च्या पिलर आणि स्थानक उभारणीचे काम सध्या वेगात सुरू असून, नुकतीच मंजुरी मिळालेल्या ‘मेट्रो १२ अ’ चे कामही जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
४. रस्ते रुंदीकरण आणि अॅक्सेस कंट्रोल मार्ग
* थेट जोडणी: अॅक्सेस कंट्रोल मार्गांमुळे कल्याणच्या पलिकडील शहरांना मुंबई आणि नवी मुंबई गाठणे सोपे होईल.
* काटई-बदलापूर मार्ग: या मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटवून त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या मार्गाला मेट्रो १४ ची जोडणी दिली जाईल.
* ऐरोली-काटई फ्री-वे: काटई नाका येथील बोगद्याचे काम वेगाने पूर्ण करून, टप्पा ३ साठीचे भूसंपादन तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
* कल्याण पूर्व: ‘यु टाईप’ (U Type) आणि श्रीमलंग रस्त्याचे काम गतीमान करण्यासाठी भूसंपादन लवकर केले जाईल. बाधित नागरिकांना ‘बीएसयूपी’ (BSUP) घरांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करून, नंतर क्लस्टर योजनेतून त्यांना हक्काची घरे आणि व्यावसायिकांना गाळे दिले जातील.
या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार राजेश मोरे, डॉ. बालाजी किणीकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेंद्र शिंदे, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह विविध शहरांच्या महापौर, उपमहापौर आणि शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

