
वंजारी समाजाचे आरक्षण कमी करा; म्हणणारे जरांगे कोण ?
शरद पवार यांचा शिलेदार ॲड. प्रताप ढाकणे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच संतापला आहे. जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण कमी करा, असे विधान केले आहे.
त्यावरून प्रताप ढाकणे यांनी जरांगे पाटलांना थेट सुनावलं आहे.
एक सामान्य कार्यकर्ता आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो, याबाबत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. तथापि, वंजारी समाजाचे दोन टक्के म्हणजे सगळेच आरक्षण कमी करण्याची मागणी करणारे जरांगे पाटील कोण? असा सवाल प्रताप ढाकणे यांनी केला. त्यांनी ही प्रतिक्रिया ‘सकाळ’शी बोलताना दिली.
प्रताप ढाकणे यांनी, “मी आजपर्यंत जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचे नेहमीच समर्थन केले आहे. मात्र, त्यांनी वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण कमी करा, अशी जी मागणी केली आहे, त्याचा निषेध करतो. एक वंजारी समाजाचा नेता नव्हे, तर सर्व समाजाकडे पाहून मला वेदना झाल्या आणि कोठेतरी जरांगे पाटील चुकीचे करत आहेत, चुकीचे बोलत आहेत, असे मला वाटते.” त्यांनी वंजारी समाजाविषयी नीट अभ्यास करून बोलायला हवं. वंजारी समाज कधीही मराठा समाजाच्या विरोधात नव्हता, असेही प्रताप ढाकणे यांनी म्हटले.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. घटनेनुसारच प्रत्येकाला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका होती, असे स्पष्ट करतानाच आजपर्यंत मी कोणत्याही आरक्षणाबाबत कधीही बोललो नव्हतो. मात्र, आज वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत जरांगे पाटील जे काही बोलले, त्याचा निषेध केलाच पाहिजे,’ असे प्रताप ढाकणे यांनी म्हटले.
आरक्षणावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला?
‘मुद्दा असा येतो, की वंजारी व मराठा समाज, असे भांडणच नाही. वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? वंजारी समाजातील एखाद्या नेतृत्वाबाबत त्यांना आक्षेप असू शकतो, याबाबत मला काही म्हणायचे नाही. पण वंजारी समाज मराठा समाजाच्या विरोधात नाही,’ असे प्रताप ढाकणे यांनी ठासून सांगितले.
समाजा-समाजात द्वेष
‘मुळात वंजारी समाज हा एनटीमध्ये आहे आणि त्याला दोन टक्के आरक्षण आहे. आता एनटीचे आरक्षण काढून घ्या, हे कुठल्या तत्त्वात बसते? आणि वंजारी समाजाविरोधात त्यांचा का रोष आहे, हे मला कळत नाही. माझ्या माहितीप्रमाणे जरांगे पाटील हे जाणीवपूर्वक समाजा-समाजात द्वेष निर्माण करतात,’ असा संशय प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केला.
आंदोलन दिशाहीन
‘हा वाद ते का निर्माण करतात, हे कळत नाही. जातीच्या भिंती उभ्या राहणे, हे चुकीचे आहे. यावरून जरांगे पाटील हे सामाजिक वातावरण का गढूळ करीत आहेत, असा माझा सवाल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण हे आंदोलन दिशाहीन होऊ नये आणि गैरसमज होऊ नयेत,’ असेही प्रताप ढाकणे यांनी म्हटले. मी म्हणेल तेच बरोबर, कोणतेही कारण मी ऐकणार नाही, अशी जरांगे पाटील यांची भूमिका असेल, तर ती योग्य नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
जाहिररित्या निषेध
‘एखाद्या समाजाला व्यथित करणे चुकीचे आहे किंवा एखाद्या समाजाचे आरक्षणच काढून घ्या, असे म्हणणे कितपत रास्त आहे? हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. वंजारी समाजातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जाहिररित्या निषेध करतो,’ असेही प्रताप ढाकणे म्हणाले.